ड्रॅगनचा फुत्कार म्हणे, आता चीनही १९६२चा राहिलेला नाही
By admin | Published: July 4, 2017 06:14 AM2017-07-04T06:14:59+5:302017-07-04T06:14:59+5:30
२०१७ मधील भारत १९६२ मधील भारतापेक्षा वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या इशाऱ्याला सोमवारी चीनने प्रत्युत्तर दिले. चीनही
बीजिंग : २०१७ मधील भारत १९६२ मधील भारतापेक्षा वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या इशाऱ्याला सोमवारी चीनने प्रत्युत्तर दिले. चीनही आता १९६२ सालचा राहिलेला नाही, याची भारताने जाणीव ठेवावी. चीन आपल्या सीमांचे व सार्वभौमत्वाचे सर्व शक्तिनिशी रक्षण करेल, असे चीनने स्पष्ट केले आहे.
५५ वर्षांपूर्वीच्या युद्धाचे संदर्भ देत, भारताने त्यापासून धडा घेण्याची गरज आहे, असे मत चीनने व्यक्त केले होते. त्यावर जेटली यांनी उत्तर दिले होते. सिक्कीम भागात भारत आणि चीन यांच्या सैनिकात जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यास चीन जबाबदार असल्याचेही जेटली यांनी म्हटले होते.
जेटली यांच्या विधानावर उत्तर देताना, चीनचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग म्हणाले की, भारताने १८९०च्या कराराचे पालन करावे आणि चीनच्या क्षेत्रात घुसलेल्या सैनिकांना परत बोलवावे. चीन आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल. चीन आणि भारतात डोकाला भागात एक महिन्यापासून तणाव निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)
सीमेचा आदर करावा
पं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एन लाय यांना लिहिलेल्या पत्रात चीन व ब्रिटनमध्ये झालेला सीमा करार मान्य केला होता व त्यानंतरच्या भारताच्या पंतप्रधानांनीही याला दुजोरा दिला होता. त्यामुळे भारताने करारानुसार ठरलेल्या सीमेचा आदर करावा, असेही चीनने म्हटले आहे.