यंदा निकाल घटल्याने गुणपडताळणी, पुनर्मुल्यांकनासाठी झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:31 AM2019-06-03T02:31:54+5:302019-06-03T02:32:07+5:30
गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुविधा
मुंबई : यंदा बारावीचा निकाल घटल्याने, विशेषत: विज्ञान शाखेच्या निकालात मोठी घट झाल्याने मुंबई विभागीय मंडळात उत्तरपत्रिकांचे पुनमुल्यांकन आणि छायांकित प्रतिसाठी झुंबड उडाली आहे. अशावेळी मंडळाकडून अर्ज करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधाही उपलब्ध करून दिल्याची माहिती मंडळाने दिली आहे. उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनाचे काम तातडीने सुरू असून ज्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे, त्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली.
यंदा पुनर्मूल्यांकनांसाठीच्या अर्जांची संख्या यंदा खूप वाढली आहे. पहिल्या दिवशी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याने सकाळी काही वेळ वेबसाइट बंद झाली होती. पुनर्मूल्यांकनासाठी पहिल्या दिवशी तब्बल ७५० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आले आहेत. वाशी येथील मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यालयात पालकांनी गर्दी केल्याने अखेर पोलिसांना पाचरण करण्याची वेळ आली होती.
विद्यार्थ्यांना झेरॉक्स प्रत मिळाल्यापासून ५ दिवसांच्या आत पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा असतो. त्यासाठी विषय शिक्षकांकडून त्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत तपासून शिक्षकांना अभिप्राय कळविण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत. याचसोबत संबंधित विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्यास अशावेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी शाळेने किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने घ्यावी अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या तक्रारी मंडळाकडकडे येणार नाहीत अशी ताकीद सचिवांकडून कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आली आहे.