धावण्याच्या अंतरात केली घट

By Admin | Published: January 13, 2016 01:28 AM2016-01-13T01:28:20+5:302016-01-13T01:28:20+5:30

पोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी

Due to the drop in the run-rate | धावण्याच्या अंतरात केली घट

धावण्याच्या अंतरात केली घट

googlenewsNext

- डिप्पी वांकाणी, मुंबई
पोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी ३ कि.मी.वरून ८०० मीटर इतके अंतर कमी केले आहे. गेल्या वर्षी पोलीस भरतीच्या वेळी धावताना चार युवकांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत शासनाने गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी मात्र या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी ११ व १४ जून रोजी राहुल सपकाळ, प्रसाद माळी, अंबादास सोनवणे व विशाल केदार हे चार युवक पोलीस भरतीच्या वेळी ५ कि.मी. धावण्याची चाचणी देत असताना मरण पावले होते. उच्च न्यायालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शासनाने धावण्याचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. चार युवकांच्या मृत्यूचे प्रकरण विधानसभेतही उपस्थित झाले होते व त्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी व गृहखात्याचे प्रतिनिधी यांना या प्रकरणाची तपशीलवार छाननी करण्यास सांगण्यात आले होते. या गटाने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने वरील निर्णय घेतला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस भरतीसाठी या आठवड्यात जाहिरात दिली जाणार असून प्रत्यक्ष भरती फेब्रुवारीत होईल. त्यांनी सांगितले की, अंतर कमी करण्याचा निर्णय माझ्या मतानुसार फार चांगला नाही. पोलीस दलात प्रत्यक्ष काम करताना जी क्षमता तरुण मुलांमध्ये असायला हवी त्यानुसार ५ कि.मी. अंतर फार नव्हते. काही वेळा तर पोलिसांना १४ तास बंदोबस्त करावा लागतो. अशा वेळी त्यांच्यात सहनशक्ती असावी लागते.

एकाच वेळी लेखी परीक्षा
एकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी परीक्षा देण्याचे टाळण्यासाठी आता पोलीस भरतीतील सर्व उमेदवारांची लेखी चाचणी राज्यभरात एकाचवेळी घेतली जाणार आहे. आतापर्यंत वेगवेगळया वेळी लेखी परीक्षा होत असे. त्यामुळे उमेदवार वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देऊन एक पर्याय निवडत असे. परिणामी बऱ्याच जागा रिकाम्या राहात.

अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार पोलीस भरती हिवाळ्यात घेण्यात यावी असे सुचविण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मुंबईत लाखावर युवक भर तीसाठी येतात. भरती प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू झाली तरी मे अखेरपर्यंत ती चालणार. त्यामुळे हिवाळ्याची अट पाळली जाण्याची शक्यता कमी आहे.

गेल्या वर्षी दुपारनंतर ही चाचणी घेतली गेली, त्यावेळी तापमानही खूप होते व आर्द्रताही जास्त होती. त्यावेळी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन चार युवक कोसळले. पण आता शारीरिक चाचणी एकतर सकाळी वा सायंकाळी ४.३० नंतर घेण्याचा निर्णय झालेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुरुंगातील सेवेसाठी पूर्वी स्वतंत्र पोलीस भरती होत होती. नव्या निर्णयानुसार आता स्वतंत्र न होता एकत्र प्रक्रियेतूनच तुरुंगासाठी पोलीस निवडले जातील.

Web Title: Due to the drop in the run-rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.