दुष्काळाची केंद्रात धग
By admin | Published: September 8, 2015 05:46 AM2015-09-08T05:46:11+5:302015-09-08T05:46:11+5:30
महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ ५९ टक्के साठा शिल्लक असल्याच्या माहितीने केंद्राच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीचा १२ टक्के तुटीच्या मान्सूनचा अंदाज आता १८ टक्क्यांवर
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ ५९ टक्के साठा शिल्लक असल्याच्या माहितीने केंद्राच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीचा १२ टक्के तुटीच्या मान्सूनचा अंदाज आता १८ टक्क्यांवर व मराठवाड्यातील तुटीच्या पावसाचे प्रमाण ४५ टक्क्यांच्या घरात गेल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भरच पडली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि देशाच्या अन्य भागात मान्सूनला परतीचे वेध लागल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविल्याने कृषी भवनात चिंतेचे मळभ आले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राला मदतीचे पॅकेज देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रासाठी मदतीच्या पॅकेजची घोषणा करण्यापूर्वी केंद्राला विस्तृत आराखडा हवा आहे. राज्य सरकारने जिल्हानिहाय अहवाल मिळण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये परतीचा पाऊस दिलासा देईल, अशी अजूनही आशा आहे. केंद्रीय जल आयोगाने सोमवारी महाराष्ट्र आणि गुजरातमधील २७ जलाशयांच्या स्थितीबाबत जारी केलेला तपशीलही
चिंता वाढवणाराच आहे. या २७ जलाशयांमध्ये केवळ ४९ टक्के पाणी आहे. हे प्रमाण गेल्या १० वर्षांतील सरासरी साठवणूक क्षमतेच्या कितीतरी कमी आहे. सप्टेंबरच्या मध्यातच परतीची वाट धरणाऱ्या मान्सूनने अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या मोदी सरकारच्या आशेला तडा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राला लागोपाठ तीन वर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कृषी मंत्रालयाच्या चमूने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणाच्या दुष्काळग्रस्त भागाला भेट दिली. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज गृहित धरून सरकारने दुष्काळाचे आव्हान स्वीकारण्याची तयारी चालविली आहे.
रेल्वे वाघिणीतून मराठवाड्यात पाणी नेण्याचा भगीरथ प्रयत्न करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. लातूर व परभणीसाठी विदर्भातील दोन धरणातून रेल्वेने पाणी नेण्याचा पर्यायही पुढे आला आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द व यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा ही धरणे शंभरटक्के भरली आहेत. हे दोन्ही प्रकल्प हावडा- मुंबई या एकाच रेल्वेमार्गावर आहेत.
गोसीखुर्दपासून धरणापासून भंडारा रेल्वेस्थानक ५० किमी, नागपूर ६० तर नागभिड ४० किमी अंतरावर आहे. तसेच बेंबळा धरणापासून धामणगाव रेल्वे हे स्थानक २५ कि.मी अंतरावर आहे.वाहतूक केव्हा, किती प्रमाणात व कशी करायची याबाबत मुख्यमंत्री फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले. नियंत्रण,अंमलबजावणी तसेच समन्वयासाठी रेल्वे व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले जाणार आहे.
उपसमितीचे अध्यक्षपदी मुनगंटीवार की खडसे?
मराठवाड्यातील दुष्काळी भागातील लोकांना मदत देण्याकरिता सध्याचे निकष बदलण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्षपद वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे की महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुनगंटीवार यांची समिती याबाबत निर्णय घेईल, असे सांगितले तर महसूलमंत्री या नात्याने या उपसमितीचे आपण अध्यक्ष असल्याचा दावा खडसे यांनी केला.
दुष्काळ जाहीर करा - सेना
मराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५०%पेक्षा खाली आलेली असताना तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत केली.
विद्यार्थ्यांची फी माफ
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची बारावीपर्यंतची फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेच्या मुलांना फीमध्ये ५० टक्के सवलत मिळेल. १.३५ कोटी शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येणार. त्याचा हप्ता सरकार भरणार. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्याच्या अर्जाला आव्हान : भंडारदरा, निळवंडे
धरणातून मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात दाखल झालेल्या मागणी अर्जाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना व संजीवनी कारखान्याच्या वतीने जलसंपदा नियमन प्राधिकरणाकडे आव्हान देण्यात आले.
महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला धीर देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या तारखेची निश्चिती येत्या आठवडाभरात होईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्लीत दिली.