शेततळ्यांमुळे दुष्काळातही हरितक्रांती, डाळिंब उत्पादनातून ५० कोटींची उलाढाल

By admin | Published: July 5, 2016 11:57 AM2016-07-05T11:57:22+5:302016-07-05T11:59:53+5:30

पाण्याचे कोणतेही स्रोत नसताना केवळ पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तेच पाणी शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंबाला वापरून अजनाळे गावाने दुष्काळातही हरितक्रांती केली.

Due to the drought, due to the drought, green revolution and pomegranate produce cost 50 crores | शेततळ्यांमुळे दुष्काळातही हरितक्रांती, डाळिंब उत्पादनातून ५० कोटींची उलाढाल

शेततळ्यांमुळे दुष्काळातही हरितक्रांती, डाळिंब उत्पादनातून ५० कोटींची उलाढाल

Next

अरुण लिगाडे

सांगोला (सोलापूर), दि. ५ - : पाण्याचे कोणतेही स्रोत नसताना केवळ पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तेच पाणी शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंबाला वापरून अजनाळे (ता. सांगोला) गावाने दुष्काळातही हरितक्रांती केली आहे. डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून या गावाची ओळख आहे. डाळिंबाच्या उत्पन्नातून सरासरी वार्षिक ५० कोटींची उलाढाल होत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. ३२५ शेततळ्यांच्या सुमारे ५०० कोटी पाणीसाठ्यामुळे अजनाळे गाव चांगली वॉटरबँक झाले असून पर्यटनाच्या दृष्टीने हे गाव आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. सांगोल्यापासून सोळा कि.मी. अंतरावरील ४५०० लोकसंख्येचे अजनाळे गाव आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २ हजार २२७ हेक्टर उंचवट्यावर विखुरलेले आहे. गावातील २०७० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून २९१ हेक्टर निव्वळ पडीक क्षेत्र आहे. गावात १६१२ खातेदार असून २२२७ हेक्टरपैकी ११०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा लागवडीखाली आहेत. तर इतर क्षेत्रावर रब्बीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका, चारा आदी पिके तर खरीप हंगामामध्ये बाजरी, मका, चारा आदी पिके घेतली जातात. या गावाला पावसाळ्यातील पाण्याव्यतिरिक्त कॅनॉल, योजना अगर प्रकल्पांतून कोणत्याही पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पडलेले पाणी अडवून दुष्काळातही पाणीटंचाईवर मात केली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून सन १९८४ पासून शंभर टक्के ठिबक सिंचनाद्वारे शेती व्यवसायावर भर दिला आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेतून गावातील ओढ्यावर दहा सिमेंट बंधारे, रोजगार हमी योजनेतून सत्तावीस पाझर तलाव, नव्वद नाले घेऊन पाणी टंचाईवर मात केली आहे. साधारण १ कोटी लिटर शेततळ्याच्या पाण्यावर २५ एकर डाळिंबाची बाग ठिबक सिंचन अंतर्गत ओलिताखाली येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्यावर अधिक भर दिला आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात फळ काढणीचा बहार असल्याने पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेततळ्यातील पाणी उपयुक्त ठरते. म्हणूनच गावात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (एन.एच.एम.) सन २०१२-१३, १३-१४ मध्ये ६४ सामूहिक शेततळ्यांना मंजुरी घेतली होती. पैकी २ कोटी १९ लाख खर्चून ४२ शेततळी पूर्ण केली आहेत. याव्यतिरिक्त येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून १ कोटी, १.५ कोटी, २.५ कोटी लिटर पाणी क्षमतेची जवळपास २७६ शेततळी निर्माण करुन पाणी टंचाईला पर्याय शोधला आहे. अजनाळे गावात शेततळ्याच्या पाण्यावर डाळिंबाच्या हरितक्रांतीमुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. जास्तीत जास्त वृक्षलागवडीचा संकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून पाझर तलाव, ओढे, नाल्यातून गाळ काढणे त्याचबरोबर विहीर, बोअर पुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात राबविली जात आहेत. पर्जन्यमान वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्याने शेत परिसरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचा संकल्प केल्याचे ग्रा.पं. सदस्य देवदत्त धांडोरे यांनी सांगितले.

शासनाने शेततळ्यास दिलेले अनुदान पुरेसे नसल्यामुळे या पैशावर शेततळी पूर्ण होणार नाहीत. काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेततळ्याला पुरेसे अनुदान दिल्याने गावात मोठ्या प्रमाणात शेततळी निर्माण झाली. भाजप आघाडी सरकारने शेततळ्याला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. - विजय येलपले सरपंच, अजनाळे

Web Title: Due to the drought, due to the drought, green revolution and pomegranate produce cost 50 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.