मराठवाडा, विदर्भावर दुष्काळाचे सावट?, केंद्राचा प्राथमिक अंदाज : १७ राज्यांचे २२५ जिल्हे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:55 AM2017-09-11T01:55:32+5:302017-09-11T01:57:05+5:30
यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.
केंद्र सकारच्या ‘नॅशनल अॅग्रीकल्चर अँड ड्रॉट अॅसेसमेंट सीस्टिम’ने वर्तविलेल्या या अंदाजानुसार काही महिन्यांपूर्वी ज्यांनी कृषिकर्ज माफीची घोषणा केली, त्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पंजाब या तीन राज्यांतील शेतीखालील मोठ्या क्षेत्रांचाही समावेश आहे. हा अंदाज खरा ठरला, तर आधीच अडचणीत असलेली तेथील शेतीच्या क्षेत्रावर आणखी ताण येईल. तज्ज्ञांच्या मते या राज्यांच्या सरकारांना जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी निधीची जुळवाजुळव करताना, मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच खरीप पिके हातची गेली,े तर नव्या अडचणी येतील.
या यंत्रणेमार्फत दरमहा तयार केला जाणारा अहवाल दिल्लीतील ‘नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर’ (एनसीएफसी)तर्फे जाहीर केला जातो. या सेंटरचे संचालक एस. एस. रे यांनी सांगितले की, आॅगस्टअखेरच्या पाऊसपाण्यानुसार ज्यांच्या बाबतीत दुष्काळाचे पहिले संकेत दिले गेले, (ट्रिगर १) अशा जिल्ह्यांची संख्या २२५ होती. यात महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश होता.
या आधी आॅगस्टमध्ये जो जुलैचा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात दुष्काळाची प्राथमिक शक्यता वर्तविलेल्या जिल्ह्यांची संख्या १०४ होती. महिनाभरात ही संख्या दुप्पट झाल्याचे दिसते.
सरकारी पाऊस बरा झाला असला, तरी मध्यंतरी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने, खरिपाच्या पिकांची हानी होण्याची शक्यता आहे. आॅगस्टअखेरचा अहवाल येत्या काही दिवसांत अधिकृतपणे जाहीर होणे अपेक्षित आहे.
हा अहवाल आला असला, तरी त्यात उल्लेख केलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दुष्काळ पडेलच असे नाही. याचे कारण असे की, दुष्काळ अधिकृतपणे जाहीर करण्याच्या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेतील ‘ट्रिगर १’ हा पहिला टप्पा आहे.
तरीही तो महत्त्वाचा आहे. कारण हा अंदाज पावसाची तूट व मध्ये गेलेले कोरडे दिवस यावर आधारलेला आहे. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पैसेवारी करणे व एकूणच पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे हे या पुढील दोन टप्पे आहेत.