पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशाचा दुष्काळ
By admin | Published: June 29, 2017 09:02 PM2017-06-29T21:02:04+5:302017-06-29T21:02:04+5:30
पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याचे संकट उभे ठाकले आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याचे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ १४ टक्के अर्जांची निश्चिती झालेली आहे. प्रवेश अर्ज निश्चित करण्याची शुक्रवारी अखेरची तारीख आहे. फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भराव्या, असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेला १९ जून रोजी प्रारंभ झाला. परंतु सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. नागपूर विभागातील सर्व ६९ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,५९५ उपलब्ध जागा आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ३६५४ अर्जांचीच निश्चिती झालेली आहे. याची टक्केवारी काढली असता ती अवघी १४.८६ टक्के आहे. त्यामुळे यंदा विभागात २० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी अर्जनिश्चिती करण्याची अखेरची मुदत आहे. अद्यापपर्यंत अर्जनिश्चितीला मुदतवाढ देण्याबाबत काही निर्देश आलेले नाहीत, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी सांगितले.