दुष्काळग्रस्त कुटुंबातील चिमुरडीचा टबात पडून मृत्यू
By admin | Published: May 18, 2016 05:27 AM2016-05-18T05:27:48+5:302016-05-18T05:27:48+5:30
लातूरमधील एका कुटुंबाच्या एक वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या टबात बुडून सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
ठाणे : मराठवाड्यात दुष्काळामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने उदरनिर्वाहासाठी ठाण्यात आलेल्या लातूरमधील एका कुटुंबाच्या एक वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या टबात बुडून सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुरडीचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता, त्याआधीच तिचा करुण अंत झाला.
ठाण्यातील भीमनगर भागात आलेल्या लातूर जिल्ह्यातील थोडगा येथील रहिवासी दयानंद वाघमारे यांच्या कुटुंबाने पाणी टंचाईमुळे सर्व भांडी भरुन ठेवली होती. त्यातीलच एका टबात बुडून परी ऊर्फ एकता (एक वर्ष) हिचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या महिन्यात वाघमारे हे एकटेच त्यांच्या सासरी भीमनगर भागात आले होते. ते छोटी-मोठी कामे करीत होते. मात्र त्यांची मोठी मुलगी सिमरन (पावणे तीन वर्ष) हिला कावीळ झाल्याने काही दिवसांपूर्वी ते आपल्या संपूर्ण कुंटुबाला येथे घेऊन आले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत फरक पडत नसल्याने ते आपल्या कुटुंबाला घेऊन पुन्हा गावी जाणार होते. त्यासाठी त्यांनी सोमवारी सांयकाळच्या गाडीची वेळही निश्चित केली होती.
मंगळवारी एकताचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाची त्यांनी तयारीही केली होती. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास दयानंद हे पगार घेण्यासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी होती. एकता घरात रांगत-खेळत होती. त्यांची पत्नी थोड्यावेळ कामासाठी बाहेर गेली असता, एकता रांगत- रांगत पाण्याच्या टबात पडली.
वाघमारे यांची पत्नी घरी येताच, त्यांचे लक्ष तिच्यावर गेले. त्यांनी तिला टबातून बाहेर काढले. शेजारच्यांच्या मदतीने तिला खासगी रुग्णालय नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला पोलिसांशी संबंधित प्रकरण असल्याने शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला वाडिया रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथेही डॉक्टरांनी तिच्यावर उपचारास टाळाटाळ केली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
>वाडिया रुग्णालयात तिला आॅक्सिजन वेळेत दिले गेले असते, तर माझ्या मुलीचे प्राण वाचले असते.
- दयानंद वाघमारे, एकताचे वडील