रात्रनिवारा केंद्रांपासूनही दुष्काळग्रस्त वंचित
By Admin | Published: September 6, 2015 01:14 AM2015-09-06T01:14:42+5:302015-09-06T01:14:42+5:30
महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही.
- प्राची सोनावणे, नवी मुंबई
महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही. विदर्भ, मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांना रात्रनिवारा केंद्रांपासूनही वंचित राहावे लागत असून, नाइलाजाने संसार पुलाखाली व तंबूमध्ये थाटावा लागला आहे.
राज्यातील भीषण दुष्काळामुळे विदर्भ व मराठवाड्यामधील अकोला, जालना, नांदेड, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील शेतकरी उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबईमध्ये येत आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतरही त्यांची फरफट थांबलेली नाही. शिक्षण कमी असल्यामुळे या ठिकाणी चांगली नोकरी मिळत नाही. नाक्यावर उभे राहून मिळेल ते मजुरीचे काम करावे लागत आहे. राहण्याची काहीही सुविधा नसल्यामुळे उड्डाणपुलाखाली व मोकळ्या जागेवर तंबू टाकून राहावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक लाख लोकसंख्या परिसरात एक याप्रमाणे रात्रनिवारा केंद्र सुरू करण्यास सांगितले होते. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी असून, तेथे जवळपास १२५ रात्रनिवारा केंद्रांची गरज आहे. नवी मुंबईची लोकसंख्या साडे बारा लाख असून, शहरात किमान १२ केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. परंतु, मुंबईमध्ये अद्याप एकही रात्रनिवारा केंद्र सुरू केले नसून नवी मुंबईमध्ये फक्त एक केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रावर तीन वर्षांत तब्बल ८ लाख ९९ हजार रुपये खर्च केले असून, फक्त १८ आश्रितांना त्याचा लाभ होत आहे. मुंबई, नवी मुंबई व इतर महापालिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्रनिवारा केंद्रे सुरू केली असती आणि त्या ठिकाणी बेघर नागरिकांना रात्री मुक्कामाची, अल्पदरात चहा, नाष्टा व जेवणाची सोय केली असती तर दुष्काळामध्ये रोजीरोटीसाठी मुंबई, नवी मुंबईत येणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुलाखाली राहण्याची वेळ आली नसती. अनेक वृद्ध नागरिकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. . दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नाकडे शासन व महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
दुष्काळग्रस्तांचे आरोग्य धोक्यात
निवाऱ्याची सोय नसल्यामुळे दुष्काळग्रस्तांनी पुलाखाली व इतर ठिकाणी आसरा घेतला आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू आहे. उघड्यावर राहणाऱ्या दुष्काळग्रस्तांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तुर्भे पुलाखाली राहणारी काही मुले अजारी पडली असून, पैसा नसल्यामुळे उपचार करता येत नाहीत. अशीच स्थिती राहिली तर दुष्काळग्रस्तांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहण्याची सोय नसल्यामुळे उघड्यावर संसार थाटला आहे. घाणीमध्ये लहान मुलांना दिवसभर ठेवावे लागत आहे. घाणीमुळे व उघड्यावरच मुक्काम करावा लागत असल्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावाकडे दुष्काळामुळे तर मुंबईत निवारा नसल्यामुळे फरफट सुरू आहे. - प्रतिभा कांबळे, दुष्काळग्रस्त, जालना