दुष्काळाची दाहकता ; उजनीतून तिबार पंपिंग करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 02:45 PM2019-05-15T14:45:16+5:302019-05-15T14:48:46+5:30

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर धरणाची पाणी पातळी उणे ५० टक्क्यांखाली जाणार आहे.

Due to drought; Tubers should be pumped from Ujani | दुष्काळाची दाहकता ; उजनीतून तिबार पंपिंग करावे लागणार

दुष्काळाची दाहकता ; उजनीतून तिबार पंपिंग करावे लागणार

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी जलाशयात अर्धा किलोमीटर आत पाईप टाकणार आता तीन टप्प्यात पाणी उपशासाठी साडेतीन कोटींचा खर्चयेत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर यंत्रसामुग्रीची खरेदी करणार

सोलापूर : शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर धरणाची पाणी पातळी उणे ५० टक्क्यांखाली जाणार आहे. याचा फटका महापालिकेच्या धरणावरील पंपगृहाला बसणार असून, इतिहासात पहिल्यांदा उजनीतून तिबार पंपिंग करावे लागणार आहे. सध्या उजनी पंपगृहापासून १०० मीटर आत पाणी उपसा करून पंपगृहाच्या चारीत सोडले जाते. धरणाची पातळी खाल्यावल्यानंतर त्यापुढे ४०० मीटर आत पंपिंग करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे.

शहराला औज बंधारा आणि उजनी-सोलापूर जलवाहिनीतून पाणी मिळते. औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. 
टाकळी इनटेक वेलमधील पाणी २१ मेपर्यंत पुरणार आहे. औज बंधाºयासाठी उजनी धरणातून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्यात येईल. महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी गंगाधर दुलंगे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता गायकवाड यांनी मंगळवारी औज बंधाºयाची पाहणी केली. त्याचा अहवाल जलसंपदा विभागाला सादर करण्यात आला. बुधवारी सायंकाळपर्यंत उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात मंगळवारी उणे ३७ टक्के पाणीसाठा होता. 

भीमेत पाणी सोडल्यानंतर धरणाची पाणीपातळी उणे ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. उजनी धरणाची पाणीपातळी उणे ५२ टक्क्यांखाली गेल्यास तिबार पंपिंग करण्याची वेळ येणार आहे. उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धरणातून सिंचनासाठी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. त्याचा फटका सोलापूर शहराला बसला आहे. 

धरणाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभारणार
- महापालिकेने २००४ मध्ये धरण काठावर दुबार पंपिंगची यंत्रणा उभारली होती. इलेक्ट्रिक यंत्रणा आणि मोटारींसाठी येथे बांधकामही करण्यात आले. उजनीची पाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली पोहोचली की दुबार पंपिंंग करावे लागते. आजवर पाचवेळा दुबार पंपिंग करावे लागले आहे. यंदा प्रथमच तिबार पंपिंग करावे लागत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता संतोष यलगुलवार आणि त्यांच्या सहकाºयांनी मंगळवारी पंपगृहापासून ४०० मीटर आत धरण काठावरच नवी जागा निश्चित केली. या जागेवर २० अश्वशक्तीचे ३९ पंप, १० अश्वशक्तीचे ५० पंप बसविण्यात येणार आहेत. नव्याने इलेक्ट्रिक यंत्रणा बसविण्यात येईल. या ठिकाणी उपसा करून थेट उजनी पंपगृहाच्या जॅकवेलपर्यंत पाणी सोडले जाईल. या कामासाठी तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्याचा अहवाल महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना सादर करण्यात आला आहे. 

पुण्याच्या कंपनीने केली पाहणी
- तिबार पंपिंंगची यंत्रणा उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा लागणार असल्याचे पाणीपुरवठा अधिकाºयांचे म्हणणे आहे. दुबार पंपिंगची यंत्रणा २००४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. तिबार पंपिंगसाठी लागणारे पंप आणि इलेिक्ट्रक यंत्रणा तातडीने खरेदी करायची की भाडेतत्त्वावर घ्यायची यावर महापालिका प्रशासन विचार करीत आहे. पुण्यातील परॉनील या कंपनीने भाडेतत्त्वावर पंपिंगची यंत्रणा उभारण्याची तयारी दाखविली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी धरण काठावर येऊन यंत्रणा उभारणीबाबत पाहणी केली.

यामुळे होईल पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा 
- जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाक्यांमधून शहरातील ६० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील ४० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. उजनी धरणातून तिबार पंपिंग सुरू केल्यानंतर उजनी ते पाकणी जलवाहिनीतून कमी दाबाने पाणी येईल, असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाºयांना वाटते. सध्या शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तिबार पंपिंग सुरू केल्यानंतर पाकणी पंपगृहावर ताण येईल. जुळे सोलापूर आणि पाकणी केंद्रातील पाणी वाटपाचा मेळ घालण्यासाठी शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागेल, असेही पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी सांगितले. 

असा खर्च, असे टप्पे 
- दुबार पंपिंगसाठी महापालिकेने ३० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. तिबार पंपिंगसाठी नवी यंत्रसामुग्री खरेदी करावी लागेल. त्यासाठी किमान तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा खर्च होईल. उजनी धरण भरलेले असते तेव्हा थेट पंपगृहातून पाणी उपसा होतो. धरण उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यानंतर १०० मीटर आत जाऊन पाणी उपसा करून पंपगृहाच्या जॅकवेलजवळ पाणी सोडले जाते. आता ४०० मीटर आत पाणी उपसा करून थेट पंपगृहाच्या जॅकवेलजवळ सोडले जाईल. या काळात दुबार पंपिंगची यंत्रणा बंदच असेल. पावसाळ्यात  धरणाची पाणीपातळी वाढू लागल्यानंतर प्रथम तिबार पंपिंंग बंद होईल. त्यानंतर दुबार पंपिंग चालू होईल. 

शहरात उद्या उशिरा पाणी येणार
- सोरेगाव आणि भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरात बुधवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी येणार असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.  सोरेगाव पंपगृहाच्या यार्डमध्ये होणारा विद्युत पुरवठा मंगळवारी दुपारी १.१५ च्या सुमाराला खंडित झाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा सकाळी १० ते ११.१५ पर्यंत आणि दुपारी ३.२० ते ४.३० पर्यंत खंडित झाला होता. या कारणामुळे टाकळी-सोरेगाव पंपगृहावरुन आणि भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्रावरून शहर पाणी पुरवठ्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होऊ शकला नाही. मंगळवारी रात्री शहरातील अनेक भागात उशिरा पाणीपुरवठा झाला. बुधवारी विविध भागातील नियोजित पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे. काही भागात कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे यांनी सांगितले. 

Web Title: Due to drought; Tubers should be pumped from Ujani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.