दुष्काळाच्या झळा, पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले गाव
By admin | Published: January 6, 2015 12:05 AM2015-01-06T00:05:16+5:302015-01-06T00:05:16+5:30
बुलडाणा जिल्ह्य़ातून शेतकरी, शेतमजुरांचे स्थलांतर.
गजानन सरकटे/देऊळगाव कुंडपाळ (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा प्रमाणात बसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोणार तालुक्यातून अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर मोठय़ा शहरांसह कर्नाटक राज्यात मजुरीसाठी स्थलांतरीत होत आहे.
पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्यांना खरीप व रब्बी हंगामात फटका बसला; सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील ३0 अल्पभुधारक शेतकरी आपल्या कुटुंबियांसह कामाच्या शोधात कर्नाटकला रवाना झाले आहेत. यावर्षी शेतकर्यांचे नियोजन कोलमडले आहे. सद्यस्थितीत शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगारासोबतच बँकाचे पीक कर्ज, सावकारी कर्ज, कुटूंबाचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न उभे आहेत. देऊळगाव कुंडपाळ येथील हरिभाऊ राठोड, अशोक सरकटे, ज्ञानेश्वर तुळशिराम सरकटे, प्रकाश गावडे, महादेव खुमणे, रामचंद्र राठोड, विनोद राठोड, लक्ष्मण राठोड, दिनकर अंभोरे, विजय राठोड, शिवाजी नाईक, चव्हाण, मुंदळकर, पिटकर, पंडितराव सरकटे, रमेश सरकटे, नारायण सरकटे, सुधाकर सरकटे, संजय सरकटे यांच्यासह गावातील अल्पभुधारक शेतकरी व शेतमजुर रोजगाराच्या शोधात कर्नाटकमधील किरणवाडी येथे स्थलांतरीत झाले आहेत. रोजगारासाठी परिसरातील अनेक शेतमजूर शहराकडे स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
*शेकडो मजुरांचे स्थलांतर
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळसह टिटवी, नांद्रा, गोत्रा, रायगाव, गंधारी, मढी, सावरगाव मुंढे, धाड, किन्ही या आदीवासी बहुल गावातून हजारो अल्पभुधारक शेतकरी व शेतमजूर मुंबई, नाशिक, सुरत, पुणे, कर्नाटक राज्यात काम शोधण्यासाठी स्थलांतरीत झाले. स्थलांतरीत मजुरांची संख्य जवळपास एक हजार दोनशे एवढी आहे.
*रोहयोची कामे कागदावरच
बुलडाणा जिल्हाभर रोजगार हमीची कामे मंजूर आहेत. परंतु, रोहयोच्या कामासाठी मजूर केवळ कागदावर दाखवून त्यांची मजुरी अधिकार्यांच्या खिशात गडप होत असल्याचे वास्तव आहे. परिणामी कोट्यवधीची कामे मंजूर असतानाही मजुरांच्या हाताला काम दिले जात नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे. रोजगार हमी योजनेच्या कमाबाबत जनजागृती नसल्याने या कामांकडे मजुरांचेही लक्ष नाही.