सत्तेची धुंदी चढल्यानेच दानवेंना दुष्काळ दिसला नाही- अशोक चव्हाण
By admin | Published: January 23, 2017 06:55 PM2017-01-23T18:55:21+5:302017-01-23T18:55:21+5:30
सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंच्या डोळ्यावर धुंदी आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 23 - सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंच्या डोळ्यावर धुंदी आली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातला शेतक-यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ दिसला नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, असे वक्तव्य करणा-या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली. काँग्रेस पक्षाने संसद, विधानसभा आणि रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांना 4200 कोटींची तुटपुंजी मदत केली. काँग्रेस पक्षाला या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून असे वक्तव्य करणे दुर्दैवी असून, दानवे यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
(युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, भाजपाचा सेनेला इशारा)
(शिवसेनेने जाहीरनामा रिपिट करून दाखवला- राधाकृष्ण विखे पाटील)
आठवड्याभरापूर्वी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात एका शेतक-याने फुंडकरांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्याच जिल्ह्यात जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे राज्यातील शेतक-यांची क्रूर थट्टा असून, शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. या असंवेदनशील वक्तव्याबाबत दानवे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, असे अशोक चव्हाण म्हणाले. याच जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मला द्या मी बदलून देतो, असे वक्तव्य केले आहे. लक्ष्मीदर्शनाच्या गप्पा मारणा-या रावसाहेब दानवे यांनी किती लोकांना जुन्या नोटा बदलून दिल्या?, याची चौकशी करण्याची आवश्यकता असून बिहार प्रदेश भाजपाप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश भाजपने जुन्या नोटांच्या माध्यमातून काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे चव्हाण म्हणाले.