त्रुटींमुळे कर्जमाफीची यादी रोखली , सहकार विभागातील सूत्रांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:54 AM2017-12-19T02:54:03+5:302017-12-19T02:54:14+5:30
शेतकरी पीक कर्जमाफीमध्ये दररोज नवीन गोष्टींचा अंतर्भाव होत असल्याने, माफीची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. त्यातच आता पात्र लाभार्थ्यांची १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेली चौथी यादी सदोष असल्याने, ती रोखून धरली आहे. राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाकडून (आयटी) यादीची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची हिरवी यादी पुन्हा नव्याने प्रसिद्ध केली जाईल
पुणे : शेतकरी पीक कर्जमाफीमध्ये दररोज नवीन गोष्टींचा अंतर्भाव होत असल्याने, माफीची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. त्यातच आता पात्र लाभार्थ्यांची १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेली चौथी यादी सदोष असल्याने, ती रोखून धरली आहे. राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाकडून (आयटी) यादीची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची हिरवी यादी पुन्हा नव्याने प्रसिद्ध केली जाईल, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.
कर्जमाफीमध्ये ३१ मार्च २०१८ अखेर एकरकमी कर्ज परतफेड केल्यास योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरण्याबाबत स्पष्टता नाही. या प्रकरणी आदेशात स्पष्टता हवी असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. कर्जमाफीच्या हिरव्या यादीत अर्ज नसलेल्याचे नाव यादीत येणे, चुकीच्या रकमा, पात्र लाभार्थ्यांच्या नावाने अर्ज करुनही यादीत नाव नसणे अशा स्वरुपाच्या अनेक त्रुटी चौथ्या यादीत आहेत. आॅनलाइन अर्ज व बँकांकडील याद्यांची तपासणी सुरु असल्याचे सांगण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेतंर्गत कर्जमाफीच्या योजनेत ५६ लाख ५९ हजार १८७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. त्यानुसार सप्टेंबर अखेर हे काम संपले. परंतु, चार महिने उलटुनही योजनेचा लाभ न मिळाल्याने शेतकºयांमध्ये असंंतोषाचे वातावरण आहे.