पुरावे भस्मसात झाल्यामुळे चौकशीत अडथळा
By Admin | Published: May 12, 2015 02:30 AM2015-05-12T02:30:17+5:302015-05-12T02:30:17+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार गोकूळ निवासमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली खरी़
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार गोकूळ निवासमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली खरी़ परंतु ही चार मजली इमारत आगीत खाक होऊन कोसळल्यामुळे पुरावेच नष्ट झाले आहेत़ त्याचा परिणाम चौकशीवर होणार असून, प्राथमिक अहवाल तयार करण्यास तीन दिवस लोटणार आहेत़
अग्निशमन दलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळाची छाननी केली़ मात्र ही इमारत संपूर्णत: कोसळल्यामुळे त्या ठिकाणी फक्त मातीचा ढिगाराच उरला होता़ हा ढिगाराही स्थानिक विभाग कार्यालयाने उपसून काढला आहे़ त्यामुळे प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच चौकशी करावी लागेल, अशी भीती अधिकारी व्यक्त करीत आहेत़ इमारतीमधील मीटर बॉक्स आणि एलपीजी सिलिंडर्सचा बेकायदा साठा, कपडे, ज्वलनशील रसायन आणि मोबाइल बॅटरीमुळे आग वाढल्याचा अंदाज आहे़
अन्य दुर्घटनांमध्ये आग विझल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आगीचा अचूक अंदाज बांधता येत असतो़ मात्र या घटनेत इमारतच कोसळल्यामुळे या घटनेचे साक्षीदार असलेल्या लोकांच्या जबाबानुसार चौकशी करावी लागणार असल्याचे समजते़ याबाबत विचारले असता, या दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यास तीन दिवस लागतील, असे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी स्पष्ट केले़
धोकादायक इमारतींचा
प्रश्न ऐरणीवर
धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची तपासणी, फायर आॅडिट, स्ट्रक्चरल आॅडिट एका महिन्यात करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत़ फायर हायड्रट पुनर्जीवित करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)