गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय मोदींवरील विश्वासामुळे - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 02:17 PM2017-12-18T14:17:35+5:302017-12-18T14:33:32+5:30
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागपूर - गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. जनता भाजपासोबत असून मोदींचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात भाजपाने यश मिळवले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यात भाजपाना यशस्वी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. "विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या भाजपाने एकूण 88 जागांवर विजय मिळवला आहे. तर 12 ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने 66 जागा जिंकल्या असून, 14 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली.