साखरेचे दर घसरल्याने कारखाने संकटात, उत्पादन ३१५ लाख टनांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:30 AM2018-04-29T05:30:52+5:302018-04-29T05:30:52+5:30

देशातील साखरेच्या उत्पादनाची वाटचाल विक्रमी ३१५ लाख टनांकडे सुरू आहे

Due to the fall in sugar prices, the factory crashes, production at 315 lakh tonnes | साखरेचे दर घसरल्याने कारखाने संकटात, उत्पादन ३१५ लाख टनांवर

साखरेचे दर घसरल्याने कारखाने संकटात, उत्पादन ३१५ लाख टनांवर

Next

चंद्रकांत कित्तुरे  
कोल्हापूर : देशातील साखरेच्या उत्पादनाची वाटचाल विक्रमी ३१५ लाख टनांकडे सुरू आहे. याचवेळी दरातील घसरणही चालूच असून ते प्रतिक्विंटल २ हजार ५२५ ते २६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेने गुरुवारी साखरेच्या मूल्यांकनात १२५सव्वाशे रुपयांची कपात करत ते २ हजार ५९० रुपयांवर आणले. यामुळे साखर कारखानदारी अभूतपूर्व संकटात सापडली आहे.
देशातंर्गत साखरेची मागणी २५० लाख टन असल्याने ६५ लाख टन साखर अतिरिक्त होणार आहे. बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा जादा झाल्याने साखरेचे दर २५२५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. या दरात साखरेचा उत्पादन खर्चही निघत नाही. एफआरपी देणेही मुश्कील बनले आहे. सुमारे २० हजार कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. ज्या साखर कारखान्यांनी ३१००, २८०० रुपयेप्रमाणे बँकेकडून उचल घेतली आहे त्यांनी सध्याच्या दराप्रमाणे साखर विकली तरी बँकेची उचल भागवण्यासाठी पैसे कमी पडतात. केद्राने २० लाख टन साखर निर्यातीला केंद्राने परवानगी दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल दोन हजारवर आले आहेत. या दराने निर्यात करणे तोट्याचे आहे. त्यामुळे कारखानदार केंद्राच्या मदतीची वाट पाहत आहेत.
निर्णय पुढील आठवड्यात
केंद्र सरकार साखरेच्या विक्रीवर उपकर लावण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

चौथ्यांदा कपात
दर घसरतील तसे राज्य सहकारी बँक साखर मूल्यांकनात कपात करत आहे. या महिन्यात गुरुवारी चौथ्यांदा कपात केली. ३१ मार्चला ३१०० रुपये असलेले मूल्यांकन ३ एप्रिलला २९२० रुपये तर १० एप्रिलला २८०० रुपयांवर आणण्यात आले. १७ एप्रिल रोजी त्यात आणखी कपात करून ते २७०० रुपयांवर आणले. गुरुवारी यात १२५ रुपये कपात करून ते २५७५ रुपये प्रति क्विंटल केले. यामुळे कारखान्यांना आता प्रतिक्विंटल २१९० रुपये उचल मिळणार आहे.

Web Title: Due to the fall in sugar prices, the factory crashes, production at 315 lakh tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.