कुटुंबीय लाड करत नसल्याने बारामतीत युवतीची आत्महत्या
By admin | Published: April 17, 2017 02:47 AM2017-04-17T02:47:20+5:302017-04-17T02:47:31+5:30
कुटुंबीय लाड करत नसल्याच्या कारणातून येथील एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली
बारामती (पुणे) : कुटुंबीय लाड करत नसल्याच्या कारणातून येथील एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. युवतीचे वडील सैन्यात कार्यरत असून ते सिक्कीम येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत.
बारामती ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या उर्फ सायली मानसिंग बळी (१७) ही एमआयडीसीतील सूर्यनगरी येथील सुधांगण बिल्डींगमध्ये भाऊ व आईसोबत राहत होती. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास तिने गावठी कट्ट्यातून कपाळाच्या मध्यभागी एक गोळी मारुन घेतली. ही गोळी तिच्या कपाळातून आरपार जाऊन बाहेर पडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिची आई भारती यांनी तिला उपचारासाठी रुई रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
गेल्या वर्षी सायली ही तिची आई व भावासह बारामतीत राहण्यासाठी होती. ती ११ वी उत्तीर्ण झाली आहे. त्यापूर्वी ती पंजाबमध्ये शिकायला होती. आपल्यावर कुटुंबीय प्रेमच करत नाही, माझे लाड केले जात नाही. या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब उघड झाली आहे. सायलीचे वडील घटनेनंतर बारामतीला येण्यासाठी निघाले आहेत. (प्रतिनिधी)