शेतकरी संपामुळे सांगलीत फळभाजी बाजारात शुकशुकाट

By admin | Published: June 2, 2017 06:12 PM2017-06-02T18:12:45+5:302017-06-02T18:17:22+5:30

कर्जमाफी व शेतीमालास हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतक-यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सांगलीतील विष्णुअण्णा फळ मार्केटलाही बसला आहे.

Due to farmers' agitation in Shanukshetkat market | शेतकरी संपामुळे सांगलीत फळभाजी बाजारात शुकशुकाट

शेतकरी संपामुळे सांगलीत फळभाजी बाजारात शुकशुकाट

Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 2 - कर्जमाफी व शेतीमालास हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतक-यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सांगलीतील विष्णुअण्णा फळ मार्केटलाही बसला आहे. 
 
शुक्रवारी संपाच्या दुस-या दिवशीही कांदा, बटाटा व लसूण यांची  आवक झाली नाही. मार्केटमध्ये शांतता पसरली आहे. दोन दिवसांत एक कोटीची उलाढाल ठप्प झाली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. दुसरीकडे मालाची आवक बंद झाल्याने हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसभर हमाल बसून राहत आहेत.
 
शेतकरी संघटनेतर्फे १ जूनपासून शेतक-यांनी संपाची हाक दिली आहे. त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्यादिवशी संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. पण संपाच्या दुस-यादिवशी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले.
 
कोल्हापूर रस्त्यावरील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये दररोज सकाळी कांदा, बटाटा, लसूण व विविध फळांची आवक होते. ही आवक संपाच्या पहिल्या दिवसापासूनच बंद झाली आहे. जो शिल्लक माल होता, त्यावरच व्यापा-यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. 
 
मात्र हा मालही शुक्रवारी दिवसभरात संपल्याने सर्व व्यापा-यांची गोदामे रिकामी दिसत आहेत. व्यापारी, दिवाणजी, कर्मचारी व हमाल शांत बसून होते. अशीच परिस्थिती आणखी दोन दिवस राहिली, तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता मार्केटमधील व्यापा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
 
विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये सातारा जिल्ह्यातील दहीवडी, फलटण, लोणंद, म्हसवड, पुसेगाव, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून कांदा व बटाट्याची आवक होते. शेतक-यांच्या संपाची तीव्रता वाढल्याने माल वाहतूक करणारे ट्रकचालकही भीतीखाली आहेत. 
 
ते माल वाहतूक करण्यास तयार नाहीत. शेतक-यांनीही भाज्यांच्या तोडी बंद केल्याने, मार्केटमध्ये संपाच्या पहिल्या व दुस-यादिवशी शुक्रवारी कांदा, बटाटा आणि लसणाची आवक झाली नाही.
 
दररोज 70 ते 80 ट्रक
सांगलीत दररोज 70 ते 80 ट्रक भरून कांदा, बटाटा आणि लसूण येतो. ही आवकच बंद झाल्याने सौद्यामधून दररोज होणारी 50  ते 60 लाख रुपयांची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. यातून व्यापा-यांना एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मार्केटमध्ये मालवाहतूक ट्रकही नाहीत. शनिवारीही आवक बंदच राहण्याची चिन्हे आहेत.
 
दररोजची आवक 
* कांदा : 500 टन
* बटाटा : 200 टन
* लसूण : 20 टन
 
फळांची आवक घटली
विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये विविध प्रकारच्या फळांची आवकही घटली असल्याचे फळ व्यापारी नवाब खानापुरे यांनी सांगितले. शुक्रवारी निम्माच व्यापार असतो. तरीही फळांची फारशी आवक झाली नाही. आंब्याचा हंगाम संपत आला आहे. तरीही अजून मागणी आहे. शनिवारी आंब्यासह डाळिंब, चिक्कू, पपई व फणसाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातूनही फळांची आवक पूर्णपणे बंद झाली, तर दर वाढतील, असेही खानापुरे यांनी सांगितले.
 
दीडशे हमाल बसून
मार्केटमधील दीडशे हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. सौद्यावेळी सत्तर ते ऐंशी ट्रकमधून कांदा, बटाटा, लूसण तसेच फळांची आवक होते. हा माल हमालांशिवाय कोणालाच उतरता येत नाही. तसेच सौदे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हा माल दुसरीकडे विकला जातो. त्यावेळीही माल ट्रकमध्ये भरण्यासाठी हमालांचीच मदत घ्यावी लागते. पण गेल्या दोन दिवसांपासून आवक बंद झाल्याने हमालांच्या हाताला काम नाही. पहाटेपासून ते दुपारपर्यंत ते मार्केटमध्ये बसून आहेत. संप कधी मिटणार? याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
मार्केटमध्ये बंदोबस्त
मार्केटमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात कांदा, बटाटा, लसूण व फळांचे सौदे केले जातात. यावेळी व्यापाºयांची मोठी गर्दी असते. शेतकरी संघटनेकडून हे सौदे उधळून लावले जाऊ शकतात, असा अंदाज बांधून शुक्रवारी सकाळी २५ ते ३० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये शस्त्रधारी पोलीसही होते. परंतु मालाची आवकच न झाल्याने दहा वाजता पोलीस निघून गेले.
 
दोन दिवसांपासून मार्केट पूर्ण बंद आहे. शनिवारीही ते बंद राहील. रविवारी सुटी असते. सोमवारपर्यंत संप मिटला नाही, तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जो शिल्लक माल होता; तो संपला आहे. सध्या गोदामामध्ये कांदा किंवा बटाट्याचे एकही पोते शिल्लक नाही. संपाचा फटका व्यापारी, हमाल व सर्वसामान्यांना बसत असल्याने सरकारने लवकर पावले उचलावीत. - मोहन माने, व्यापारी, विष्णुअण्णा फळ मार्केट, सांगली.
 
 

 

Web Title: Due to farmers' agitation in Shanukshetkat market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.