शेतकरी संपामुळे रमझानमध्ये फळांऐवजी सुक्या मेव्याला अधिक पसंती!
By admin | Published: June 6, 2017 02:02 AM2017-06-06T02:02:19+5:302017-06-06T02:02:19+5:30
ऐन रमजानमध्ये शेतकऱ्यांनी पुकारल्याने संपाचा फटका फळांच्या पुरवठ्यावर झाला आहे.
अक्षय चोरगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन रमजानमध्ये शेतकऱ्यांनी पुकारल्याने संपाचा फटका फळांच्या पुरवठ्यावर झाला आहे. फळांची आवक घटल्याने, इफ्तारीसाठी पुरेसा पुरवठा होत नसल्याने मुस्लीम बांधवांची पसंती सुक्या मेव्याला मिळत आहे. खजुराला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र शहरातील बाजारांमध्ये पाहायला मिळत आहे.
मुस्लीम बांधवांमध्ये रमजान महिन्यात रोजा सोडताना खजूर खाण्याला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम बांधव खजुराची खरेदी करताना दिसतो. खजुरासह रमजानमध्ये सुक्या मेव्याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यात फळांची आवक घटल्याने किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांकडून सुक्या मेव्याला अधिक पसंती मिळत असल्याचे मस्जिद बंदर येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी या काळात फळबाजारात होणारी गर्दी यंदा कमी झाल्याचे पाहावयास मिळते.
सुक्या मेव्यात बदाम प्रति किलो १ हजार रुपयांपासून १ हजार ४०० रुपये दराने विकले जात आहेत, तर काजूची किंमत बदामापेक्षा थोडी जास्त असून, ग्राहकांना प्रति किलोसाठी १ हजार १०० ते १ हजार ६०० रुपये मोजावे लागत आहेत. सुक्या मेव्याच्या बाजारात खजूर भलताच भाव खाऊन जात आहे. शंभर रुपयांपासून तब्बल २ हजार रुपये किलो दराने खजुराची विक्री होत आहे. यामध्ये अजवा खजुराची किंमत प्रति किलो २ हजार रुपयांहून अधिक आहे.
खजुरांची मिजासच न्यारी!
मुंबईतील बाजारांमध्ये परराज्यासह परदेशातून मोठ्या प्रमाणात खजुराची आयात केली जाते. इराण, अल्जेरिया, इराक, इंडोनेशिया, मस्कत, ओमान या देशांमधील खजुरांना विशेष मागणी आहे. कश, इराकी, इराणी, अंगुरी, किमिया, शबानी, तईबा, सिडलेस खजूर (बी विरहित खजूर), ओमानी रसगुल्ला खजूर अशा नानाविध प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत.
>...म्हणून खजुराला मागणी!
दिवसभर रोजा ठेवल्यानंतर संध्याकाळी सुका मेवा, खजूर आणि फळे खाल्ल्यानंतर दिवसभरात शरीराला आलेला थकवा पळून जातो, असे मुस्लीम बांधवांचे म्हणणे आहे. खजूर आरोग्यदायी तर आहेच. मात्र, इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत स्वस्त असल्याने, खजुराला सर्वच थरांतून अधिक मागणी असते.
>कुराणमध्येही खजुराला महत्त्व!
खजुराला कुराणमध्ये महत्त्व आहे. खजूर खाऊन रोजा सुरू करावा आणि रोजा सोडावा, असे मोहम्मद पैगंबर सांगत. याशिवाय
खजूर हे फळ स्वर्गातून आपल्याला मिळालेली देणगी आहे, असेही इस्लाममध्ये मानले जाते.
- डॉ. अब्दूर रेहमान अंजारिया, इस्लाम धर्माचे अभ्यासक
सुक्या मेव्याला दरवर्षी रमजानमध्ये मोठी मागणी असते, परंतु बाजारात फळांचा तुटवडा असल्याने, यंदा सुक्या मेव्याची मागणी अधिक आहे. त्यात किंमत कमी असल्याने खजुराची जोरदार विक्री सुरू आहे.
- सईद शेख, सुका मेवा विक्रेता