बीडमध्ये ISIS जाळं पसरवण्याच्या भीतीने ATS कडून झाडाझडती

By Admin | Published: July 16, 2016 06:17 PM2016-07-16T18:17:02+5:302016-07-16T18:17:02+5:30

इसिस ही संघटना परभणीपाठापोठ बीडमध्ये आपले जाळे पसरविण्याच्या शक्यतेमुळे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने खबरदारी म्हणून झडती घेण्यास सुरुवात केली आहे

Due to the fear of spreading the ISIS network in Beed, plantations from the ATS | बीडमध्ये ISIS जाळं पसरवण्याच्या भीतीने ATS कडून झाडाझडती

बीडमध्ये ISIS जाळं पसरवण्याच्या भीतीने ATS कडून झाडाझडती

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
बीड, दि. 16 - इसिस ही संघटना परभणीपाठापोठ बीडमध्ये आपले जाळे पसरविण्याच्या शक्यतेमुळे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने खबरदारी म्हणून झडती घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एक पथक जिल्ह्यात येऊन गेले असून बीड पुन्हा एटीएसच्या रडारवर आले आहे.
 
परभणी येथून नासेरबीन चाऊस या ‘इसिस’च्या हस्तकाचा नुकताच पर्दाफाश झाला. त्यामुळे दहशतवादी संघटना मराठवाड्यात पुन्हा सक्रिय झाल्याचा धोका वाढला आहे. देशभर गाजलेल्या जर्मन बेकरी स्फोट व वेरुळ शस्त्रसाठा प्रकरणांचे धागेदोरे यापूर्वीच बीडमध्ये आढळलेली आहेत. त्यानुषंगाने ‘इसिस’सारख्या खतरनाक दहशतवादी संघटना बीडमध्ये आपले ‘नेटवर्क’ उभे करण्याची शक्यता असल्याच्या संशयावरुन एटीएस सतर्क झाले आहे. गुप्तचर यंत्रणेसह, दहशतवाद विरोधी प्रतिबंधक कक्षातील अधिकारी, कर्मचारी प्रत्येक बारीक- सारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी दोन अधिकारी व तीन कर्मचाºयांच्या एका पथकाने बीड व परळीत गोपनीय चौकशी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ही चौकशी अतिशय गोपनीय होती. एटीएसने सोशल मीडियावरही आपले लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे. दहशतवादी कारवायांसाठी इंटरनेटचा वापर होत असल्याचे लक्षात घेऊन नेट कॅफेंमध्ये येणाºयांची नोंद ठेवणे, सीसीटीव्ही लावणे सक्तीचे केले आहे. 
 
दरम्यान, २३ फेब्रुवारी २०१२ मध्ये पुणे येथील जर्मन बेकरी स्फोटात बीड जिल्ह्यातील हिमायत बेगचा सहभाग असल्याचे उघड झाले  होते. त्याला एटीएसने उदगीरमधून उचलले होते. टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. आक्षेपानंतर न्यायालयाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
त्याआधी २००५ मध्ये औरंगाबादजवळील वेरुळ परिसरात बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळला होता. यात बीडमधील नऊ तरुणांची नावे समोर आली होती. यापैकी जबियोद्दीन अन्सारी याला अटक झाली होती. तो अजूनही जेलमध्ये आहे. नंतर २६ नोव्हेंबर २०११ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर मार्इंड अबू जिंदाल हा जबियोद्दीन अन्सारीच असल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे जबियोद्दीन याने बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विद्युतजोडणीचे काम केले होते. वेरुळ शस्त्रसाठ्याचे धागेदोरे आढळल्यापासून बीडमध्ये एटीएसचा राबता वाढला आहे.
 
मर्मस्थळांच्या सुरक्षेबाबत खबरदारी
बीड जिल्ह्यात सात मर्मस्थळे असून त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेतली जात आहे. परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर, औष्णिक विद्युत केंद्र, अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील उच्चशक्ती दूरदर्शन केंद्र, माजलगाव धरण, केज तालुक्यातील धनेगाव धरण व बीडमधील आकाशवाणीचा यात समावेश आहे. या सर्व ठिकाणी २४ तास बंदूकधारी जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत. तेथे सीसीटीव्ही लावले असून रात्रीच्या वेळी लक्ष ठेवण्यासाठी टॉवरद्वारे प्रकाशझोताची व्यवस्था केली आहे. मर्मस्थळांच्या सुरक्षेचा आढावाही नियमित घेतला जात आहे.

Web Title: Due to the fear of spreading the ISIS network in Beed, plantations from the ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.