धुक्यामुळे नवी मुंबईकरांचा दम निघाला , खोकला वाढला, श्वसनाच्या आजारांचा धोका वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:46 AM2017-12-10T04:46:59+5:302017-12-10T04:47:23+5:30
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे.
- प्राची सोनवणे
नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे. या विचित्र वातावरणामुळे नवी मुंबईकरांचा दम निघाला आहे. ज्यांना श्वसनविकार आहे, अशा रु ग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, तर मुलांमध्ये रात्री खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
हवामानातील उष्मा, दमटपणा वाढतो, असे वातावरण खोकल्याच्या व घशाच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या आजारांसाठी पोषक असते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याने धूळही मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे. त्यामुळे संसर्गामुळे खोकला होण्याचे प्रमाण वाढेल असे श्वसनविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले. औद्योगिक वसाहतीमुळे जल व वायुप्रदूषण, वाढत्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी व त्याचा आरोग्यावर होणारा जीवघेणा परिणाम ही जागतिक पातळीवरची गंभीर समस्या बनली आहे. दिवाळीत झालेल्या वायू व ध्वनिप्रदूषणाने तब्येत बिघडलेल्या नवी मुंबईकरांवर या वातावरणाचा अजून गंभीर परिणाम होणार असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
खारघर परिसराच्या जवळच तळोजा औद्योगिक वसाहत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा आहे. त्यामुळे येथे प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. वारंवार तक्र ारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
धुळीचे प्रमाण ५६.२५%
वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या वायुप्रदूषणाच्या अहवालानुसार सद्य:स्थितीत नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, ६८.९४ टक्के नोंदविण्यात आली आहे. धूलिकणाचे प्रमाण सर्वाधिक असून श्वसनविकाराला कारणीभूत ठरणारे आहे. शहरात धुळीचे प्रमाण ५६.२५ इतके आहे, तर शुद्ध हवेचे प्रमाण केवळ ३१ टक्के इतके आहे.
बदल शरीराला बाधक
गेल्या संपूर्ण महिन्यात दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक गार वारे असा विचित्र बदल शरीराला बाधक ठरत आहे व या बदलामुळे दमा, सुका खोकला आणि रक्तदाब असे विकार नागरिकांमध्ये बळावले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ओखी’ वादळामुळे गेले दोन दिवस नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडला आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे मलेरिया, डेंग्यूतही वाढ होणार आहे.
लक्षणे : श्वसनास अडथळा निर्माण होणे, डोळे चुरचुरणे, खाज येणे, घसा बसणे, नाकातून पाणी येणे
हे करा : घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या, डोक्यावर टोपी घाला, रुमालाने चेहरा झाका, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स घाला, योग्य आहार व व्यायाम महत्त्वाचा