केंद्राच्या निधीअभावी राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 21:40 IST2020-02-16T18:54:58+5:302020-02-16T21:40:05+5:30
'टोल नाक्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दिसून येते'

केंद्राच्या निधीअभावी राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली - अशोक चव्हाण
पुणे : केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या भारंभार घोषणा केल्या. मात्र, त्यासाठी लागणारा निधी न दिल्याने अनेक रस्त्यांची कामे रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. रविवारी पुणे येथे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी खेड शिवापूरच्या आंदोलनाचाही प्रश्न उपस्थित झाला. त्यावर चव्हाण यांनी सांगितले की, खेड शिवापूरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्ता आहे. केंद्र सरकारचा हा रस्ता टोलवर आधारीत करारानुसार तयार झाला आहे. टोल नाक्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दिसून येते. भाजपाचा या टोल नाक्याला विरोध होता तर हा रस्ता तयार करतानाच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती.
मागील वर्ष-दीड वर्षात केंद्र सरकारकडून निधी येत नसल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कामांसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. रस्त्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ते पुढे म्हणाले.
आणखी बातम्या...
'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे
भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या
आर. आर. आबांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार