जागतिक तापमानवाढीमुळे वर्षभरात दीड हजार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:05 AM2019-01-18T06:05:03+5:302019-01-18T06:05:35+5:30
२०१८ ठरले सहावे उष्ण वर्ष : केंद्रीय पृथ्वी, विज्ञान मंत्रालयाची माहिती
- सचिन लुंगसे
मुंबई : कार्बन उत्सर्जनाचा परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढीचा धोका वाढत आहे. जागतिक तापमानात वाढ झाल्याने आपत्कालीन घटना वेगाने घडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे उष्णतेत वाढ होत असून, २०१८ या वर्षाची सहावे उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. तसेच या वर्षी देशभरात घडलेल्या आपत्कालीन घटनांमुळे तब्बल १ हजार ४२८ जणांचे बळी गेले आहेत.
मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या, वाढते कार्बन उत्सर्जन आदी कारणांमुळे पृथ्वीवरील हवामानात येत्या काही वर्षांत अत्यंत घातक बदल होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या तापमानवाढीचे परिणाम बदलत्या हवामानाच्या रूपाने जाणवू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत सर्व ऋतू बदलत चाललेले आहेत. पावसाळा अनियमित झाला असून चक्रिवादळे होण्याचे प्रमाणही सगळ्यांच देशात वाढलेले पाहायला मिळत आहे. याचा परिणाम सर्व देशांप्रमाणेच भारत व महाराष्टÑातही प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
केंद्राच्या पृथ्वी, विज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिमवृष्टीत ११ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल, मे महिन्यात राजस्थानातील धूळीच्या वादळाने ६८ जणांचा तर, जून ते सप्टेंबरमध्ये गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसासह आलेल्या पुराने ५२ जणांचा बळी घेतला. जून ते सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात झालेला मुसळधार पावसामुळे आणि पुरात १३९ जणांना, तर ८ ते २३ आॅगस्टदरम्यान केरळमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे २२३ जणांचा मृत्यू झाला. १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान ‘गाजा’ चक्रिवादळामुळे तामिळनाडूत ४५ जणांचा मृत्यू झाला.
याचप्रमाणे जून ते सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसासह पुरात १५८ जण मृत्युमुखी पडले. एप्रिल, मे महिन्यांत देशात आलेल्या वादळांनी १६८ जणांचे बळी घेतले. जून महिन्यात वीज पडून ३९ जण मरण पावले. २ ते ६ मेदरम्यान धूळीच्या वादळाने देशात ९२ जणांचे बळी घेतले. तर, ३ ते १३ जानेवारीदरम्यान थंडीच्या लाटेत १३५ जणांचा मृत्यू झाला. १४ ते २९ जूनदरम्यान आसाममधील मुसळधार पाऊस आणि पुरात ३२ जणांचे बळी गेले. तर, जून ते सप्टेंबर महिन्यात पश्चिम बंगालमधील पाऊस आणि पुराने ११६ जणांचा जीव घेतला. जून ते जुलैदरम्यान झारखंडमध्ये आलेल्या वादळांमुळे ७५ जणांना तर १२ ते १४ आॅक्टोबरदरम्यान ओडिशामधील ‘तितली’ वादळामुळे ७७ जणांना जीवास मुकावे लागले आहे.
...म्हणूनच होतेय तापमानात वाढ
जागतिक तापमान वाढीसाठी कर्ब वायूंपैकी ७० टक्के कारणीभूत असणारा वायू म्हणजे कार्बन डायआॅक्साईड. दुसरा मिथेन आणि तिसरा नायट्रस आॅक्साइड.
कार्बन डायआॅक्साइड हा प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन पद्धतीने उत्सर्जित होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात हाच वायू बाहेर टाकला जातो.
जंगलांना आग लागते तेव्हाही हाच वायू बाहेर टाकला जातो. शिवाय कोळसा, लाकूड, पेट्रोल आणि डिझेल यांच्या ज्वलनामुळेदेखील तो बाहेर पडतो. पेट्रोल, डिझेल हे कारखाने तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना मोठ्या प्रमाणात लागते. त्यातच दरवर्षी वाहनांची संख्या वाढतच चालल्याने पेट्रोल-डिझेलचा वापरही वाढत आहे. साहजिकच कार्बन डायआॅक्साइडचे दैनंदिन वातावरणातील प्रमाणही वाढत आहे.