सरकारी अनास्थेमुळे तूर खरेदी ठप्प!
By admin | Published: March 3, 2017 05:36 AM2017-03-03T05:36:48+5:302017-03-03T05:36:48+5:30
यावर्षी पाऊसपाण्याने साथ दिल्याने कधी नव्हे ते राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले.
मुंबई : यावर्षी पाऊसपाण्याने साथ दिल्याने कधी नव्हे ते राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. परंतु बारदाने उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन नाफेडची बहुतांश खरेदी केंद्रे सध्या बंद ठेवण्यात आली असून जी सुरू आहेत त्याच्यापुढे शेतकऱ्यांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. खान्देश, विदर्भ, मराठवाडा या तुरीचे आगार समजल्या जाणाऱ्या भागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची त्यामुळे परवड सुरू आहे. विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तूरीची पेरणी वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते.
गतवर्षी तुरीचे भाव गगनाला भिडल्याने सरकारच्या नाकेनऊ आले होते. तर आता भरघोस उत्पादन होऊनही केवळ सरकारी अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. तुरीला ५०५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. परंतु नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सरासरी ४३७९.२५ (४२५ रुपये बोनससह) याप्रमाणे शेतकऱ्याला दर मिळत आहेत. खुल्या बाजारात जेमतेम ३२०० ते ३५०० रूपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची भिस्त शासकीय तूर खरेदी केंद्रांवर आहे. परंत तिथे तर बारदाना नसल्याने कारण पुढे करत तूरखरेदी थांबविण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा संयमही सुटत चालला असून गुरुवारी हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे नाफेडच्या अधिकाऱ्यास मारहाण झाल्याचा प्रकार घडला. निवडणूक संपली की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले का, असा संतप्त सवाल केला जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>हिंगोली जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंद
हिंगोली जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बारदाने उपलब्ध नसल्याचे कारण देत तूर खरेदी बंद केली आहे. हिंगोलीसह वसमत व जवळा बाजार येथे नाफेडने हमी भावाने तूर खरेदी सुरू केली होती.
चाळणी केलेला माल ते ५०५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करीत होते. वसमतला चार हजार क्विंटल तर हिंगोलीत १५ हजार व जवळा बाजार येथे ६ हजार ५७७ क्ंिवटल तूर खरेदी झाली आहे. अजूनही हजारो क्ंिवटलच्या थप्प्या पडून आहेत.
बारदाण्याअभावी त्यांचे मोजमाप व इतर प्रक्रिया बाकी आहेत. सेनगाव येथे नाफेडचे केंद्र मंजूर असूनही ते सुरू झाले नाही. तर तालुक्यातील कोळसा येथे एका खाजगी कंपनीतर्फे २५00 क्विंटल तूर खरेदी केली. तेथेही बारदाण्याअभावी खरेदी बंद आहे.
धुळे जिल्ह्यात खरेदी बंदच
धुळे जिल्ह्यात धुळे व शिरपूर येथील बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र सध्या बारदानाअभावी ही केंद्रे बंद आहेत. २७ फेब्रुवारीपर्यंत १० हजार ८५४ क्विंटल तुरीची खरेदी झाली होती. खरेदी केंद्रांवर एफएक्यू दर्जाची तूर ५०५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येत होती. परंतु सर्वच शेतकऱ्यांकडे अशी दर्जेदार तूर नाही. त्यामुळे ते व्यापाऱ्यांना तूर विक्री करत असून त्यांना ४२०० ते ५००० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
यवतमाळात निम्मी केंद्रे बंदच
खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत परंतु बारदान उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील १६ पैकी आठ केंद्रे बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी केली जाईल, त्यासाठी १५ मार्चचे बंधन राहणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील केंद्रे बंदच
नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, नायगाव, देगलूर व हदगाव या पाच ठिकाणी १ जानेवारीपासून खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली होती. परंतु सर्व केंद्रे बारदान नसल्याचे कारण देत २३ फेब्रुवारीपासून बंद आहेत. आजपर्यंत नांदेड येथील खरेदी केंद्रावर ११ हजार क्विंटलवर तुरीची खरेदी झाली असून अडीच हजार क्विंटल मोजमाप होणे बाकी आहे.
जागा नसल्याने तूर
खरेदीवर संक्रांत!
अकोला जिल्ह्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर जागा व बारदाने नसल्याने संक्रांत आली आहे. अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर येथे नाफेडच्यावतीने तुरीची खरेदी सुरू आहे. यावर्षी हमी दरासह बोनसही असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकणे पसंत केले. मात्र, कधी बारदाना नसल्याने, तर कधी जागा नसल्याने नाफेडच्या खरेदीत व्यत्यय येत आहे. अकोल्यात आतापर्यंत ६० हजार क्विंटलच्या वर नाफेडने तूर खरेदी केली आहे.
हजारो शेतकरी रांगेत
परभणी जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र असून सर्वच केंद्रांवर गेल्या आठ दिवसांपासून हजारो शेतकरी वाहनांच्या रांगा लावून तूर विक्रीची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे. परभणी, सेलू, गंगाखेड, मानवत आणि जिंतूर असे पाच हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले. मात्र काट्यांची कमतरता, चाळण्यांचा अभाव , तूर साठविण्यासाठी बारदाना नसल्याने खरेदी करताना अडचणी येत होत्या. सद्यस्थितीला पाचही केंद्रासमोर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आठवडाभरापासून शेतकरी रांगेत असल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.
बुलडाण्यात
पाच केंद्रे बंद!
बुलडाणा जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सात केंद्रांवर तुरीची खरेदी करण्यात येत आहे. मात्र बारदाण्याअभावी शेगाव, संग्रामपूर, चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा अशी पाच केंदे्र बंद आहेत. केवळ बुलडाणा व मेहकर या दोनच ठिकाणी खरेदी सुरू आहे.