पनामा प्रकरणी अमिताभ यांच्या अडचणीत वाढ, बोर्ड मीटिंगमध्ये सहभागी झाल्याची कागदपत्रे उघड
By admin | Published: April 21, 2016 09:28 AM2016-04-21T09:28:15+5:302016-04-21T12:58:37+5:30
सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड आणि ट्रंप शिपिंग लिमिटेडच्या संचालक मंडळांच्या बैठकीत अमिताभ बच्चन यांनी टेलीफोन कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला होता.
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २१ - पनामा पेपर्स लीक प्रकरणी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांनी पनामाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. मात्र मोसाक फोन्सेकाच्या कागदपत्रांवरुन अमिताभ बच्चन 1993 ते 1997 दरम्यान चार शिपिंग कंपन्यांचे संचालक होते हे सिद्ध झालं आहे. तसंच यापैकी दोन कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकीत फोन कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्याचंही उघड झालं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड आणि ट्रंप शिपिंग लिमिटेडच्या संचालक मंडळाने 12 डिसेंबर 1994ला 1.75 मिलिअन डॉलर कर्जासंबंधी ठराव मंजूर केला होता. या ठरावांसंबंधी झालेल्या संचालक मंडळांच्या बैठकीत अमिताभ बच्चन यांनी टेलीफोन कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला होता. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या प्रमाणपत्रात अमिताभ बच्चन यांचा संचालक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
पनामा पेपर्स लीकमध्ये अमिताभ बच्चन यांचं नावही समोर आलं होतं. सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड,लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेझर शिपिंग लिमिटेड, ट्रंप शिपिंग लिमिटेड या कंपन्यांवर अमिताभ बच्चन संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक असल्याचं पनामा पेपर्स लीकमधून उघड झालं होतं.
पनामा पेपर्स लीकमध्ये नाव आल्यानंतर अमिताभ बच्चन यांना फोन आणि मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. अखेर अमिताभ बच्चन यांनी निवेदन जारी करत आपण यातील एकाही कंपनीशी संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसंच यातील एकाही कंपनीला आपण ओळखत नसल्याचंही बोलले होते. माझ्या नावाचा दुरुपयोग केला गेला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.
इंडियन एक्स्प्रेसने कागदपत्रे जाहीर केली आहेत ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ट्रंप शिपिंग लिमिटेड (बहामाज) आणि सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड (ब्रिटीश वर्जिन आयलँड) यांची 12 डिसेंबर 1994मध्ये मीटिंग झाली होती. दोन्ही कंपन्यांच्या कागदपत्रांवर अमिताभ बच्चन यांच्या नावाचा संचालक आणि पदाधिकारी म्हणून उल्लेख आहे.