तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली; फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:09 PM2021-07-22T13:09:09+5:302021-07-22T13:10:53+5:30
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली, किरवे, लोंघे गावांमध्ये पुरामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
प्रकाश काळे, लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी: ढगफुटीसदृश्य चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कोल्हापूरदरम्यान ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बं झाली आहे. तर फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्राचा ब-याचअंशी संपर्क तुटला आहे.
मंगळवार(ता.२०) सकाळपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूरातील बहुतांश सर्व नद्याची महापूरसदृश्य स्थिती आहे. बुधवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. तसेच सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ग्रामीण भागातील रस्त्याना नदीचे रुप प्राप्त झाले आहे.
गगनबावाडा कोल्हापूर दरम्यान मांडुकली, किरवे, लोंघे येथे बुधवारी मध्यरात्री पासून रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून गगनबावडामार्गे कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. तर रस्ता खचल्यामुळे करुळ घाटमार्गांची वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली असून याही घाटाय दरडींची पडझड सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा परिसरात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने पुढील दोन-तीन दिवस हा मार्ग बंद राहणार आहे.