मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:11 PM2017-08-29T20:11:58+5:302017-08-29T20:15:23+5:30
मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे.
ठाणे, दि. 29 - मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे.
ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणनं वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत. तेथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. या परिस्थित नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार तसंच गरजेनुसार आपल्या नजिकच्या कार्यालयाशी / संबंधित अधिका-यांशी अथवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१) ठाणे १ विभाग
- गडकरी उपविभाग - ३ फिडर बंद – सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित
- कोपरी उपविभाग – १ फिडर बंद - सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित
- किसान नगर उपविभाग – डी.टी.सी. बंद – सुमारे ३ हजार ग्राहक प्रभावित
२) वागळे विभाग – २५ फिडर – सुमारे १,२५ ,००० हजार ग्राहक प्रभावित
३) ठाणे २ विभाग
- कळवा उपविभाग – ४ फिडर बंद – सुमारे ४५ हजार ग्राहक
- विकास उपविभाग – ४ फिडर – सुमारे १० हजार ग्राहक
- पावरहाउस – माहिती लवकरच उपलब्ध होईल
४) ठाणे ३ विभाग - सुमारे ११०००० हजार ग्राहक
५) भांडुप विभाग – १ सब स्टेशन व ४ फिडर - सुमारे १६००० हजार ग्राहक
६) मुलुंड विभाग – ५ सब स्टेशन - सुमारे ७६००० हजार ग्राहक
७) वाशी विभाग
- एरोली उपविभाग - ४ फिडर – २० हजार ग्राहक
- कोपर खैरणे उपविभाग – १ ट्रान्सफॉर्मर – १ हजार ग्राहक
- वाशी उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक
८) नेरूळ विभाग – प्रभावित नाही
९) पनवेल विभाग
- पनवेल १ (भिंगरी) उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक
- उरण उपविभाग – १ उपविभाग – १००० ग्राहक
पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'
दरम्यान, मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे. कधीही न थांबणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुंबईतल्या तुफान पावसामुळे बंद करण्यात आला आहे. एक्स्प्रेस वेवरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करणार आहेत. महामार्ग पोलिसांकडून मुंबईला जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे. पावसाने उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मुंबई एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. सी लिंकवरही टोल घेतला जाणार नाही असे ट्विटट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुंबईवरुन आलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेचा द्रुतगती मार्ग 6:30 पासून बंद केला. तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व लोकल मार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे चहूबाजूंनी मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुंबई- पुणे महामार्गही रोखण्यात आला आहे. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कुसगाव, उर्से टोलनाक्याजवळ रोखली जुना हायवे NH 4 ही बंद करण्यात आला आहे. नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबवली आहे. वी मुंबईतील सायन झ्र पनवेल हायवे, ठाणे झ्र बेलापूर हायवे, शिळफाटा मार्ग या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी आहे.