तूफान पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या
By Admin | Published: September 21, 2016 08:44 AM2016-09-21T08:44:55+5:302016-09-21T08:47:06+5:30
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम असून पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम असून पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे स्थानकांवरील रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून लांब पल्ल्याच्या गाड्याही रखडल्या आहेत. तसेच सिग्नल यंत्रणेतही बिघाड झाल्याने त्याचा परिणामही रेल्वेल वाहतुकीवर झाला आहे.
बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम असून मुंबईसह माटुंगा, वांद्रे, कांदिवली, येथेही तूफान पाऊस कोसळत असून पालघर, बोईसर येथे तर रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे पालघरहून मुंबईच्या दिशेने येणा-या लोकल तसेच गुजरातहून मुंबईला येणा-या एक्स्प्रेस सेवेवरही परिणाम झाला आहे.
दुसरीकडे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वे सह अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच ठाण्याजवळ खारेगाव टोलनाक्याच्या येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्याची माहिती मिळत आहे.