प्रचंड गर्दीमुळे वाहतूककोंडी
By admin | Published: January 4, 2016 12:55 AM2016-01-04T00:55:55+5:302016-01-04T00:55:55+5:30
अत्यंत शिस्तबद्धपणे शिवशक्ती संगमचा सोहळा पार पडला. मात्र, सायंकाळी साडेसहानंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने आणि कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीचा
पिंपरी : अत्यंत शिस्तबद्धपणे शिवशक्ती संगमचा सोहळा पार पडला. मात्र, सायंकाळी साडेसहानंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने आणि कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीचा त्रास संघ कार्यकर्त्यांसह सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागला. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस आणि संघ कार्यकर्त्यांची दमछाक झाली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर होणाऱ्या शिवशक्ती संगमाकडे जाण्यासाठी सात मार्गांची व्यवस्था केली होती. १) वाकडगाव ते हिंजवडी- मारुंजीमार्गे नेरेच्या सीमेवरील संघस्थान २) थेरगाव डांगे चौक-भूमकरवस्ती-मारुंजीमार्गे संघस्थान ३) तळेगाव कासारसाईमार्गे संघस्थान ४) पुनावळे-कोयतेवस्ती वनक्षेत्र ५) पुनावळे-कोयतेवस्ती ते संघस्थान ६) पुनावळे-कोयतेवस्ती-नेरेमार्ग संघस्थान ७) पौड-हिंजवडी-मारुंजी ते संघस्थान असे प्रमुख मार्ग होते.
मुख्य सोहळा शंभर एकर जागेवर होता. तर उर्वरित तीनशे एकर जागेवर पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नगर या जिल्ह्यांतील स्वयंसेवकांसाठी तळ आणि संघ कार्यकर्त्यांची सोय केली होती. संघस्थानाच्या चारही दिशांना विभागांनुसार व्यवस्था केली होती. तसेच प्रमुख चौकाचौकांत आणि रस्त्यावर मार्गदर्शक फलकही लावण्यात आले होते. तसेच चौकांमध्ये पोलिसांबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवक उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमास येताना कोंडी झाली नाही. कार्यक्रमस्थळाच्या दीड-दोन किलामीटर अलीकडे केवळ व्हीआयपी आणि मंत्री, अधिकारी अशा पासधारकांची वाहने वगळता कोणाचीही वाहने सोडली जात नव्हती. त्यामुळे कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांना किमान दोन किलोमीटर पायी चालून संघस्थानाकडे जावे लागत होते. ज्येष्ठांसाठी खासगी वाहनांची सुविधा होती. मात्र, तीही अपुरी पडली.
अत्यंत शिस्तबद्धपणे मुख्य सोहळ्याची सांगता झाली. तोपर्यत सायंकाळचे साडेसहा वाजले होते. अंधार पडल्यानंतर एकाच वेळी व्हीआयपी आणि नागरिकांनी वाहने काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविताना पोलीस आणि स्वयंसेवकांची दमछाक झाली. एकाच वेळी वाहने आणि कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. त्यामुळे पुण्याकडे आणि पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी झाली. एकाच वेळी पुण्याच्या दिशेने वाहने जात होती. (प्रतिनिधी)
शिवशक्ती संगमाचा विश्वविक्रम
शिवशक्ती संगमावर झालेल्या विराट कार्यक्रमाने विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. या कार्यक्रमाची लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. शिवशक्ती संगमासाठी एक लाखाहून अधिक स्वयंसेवक आणि पन्नास हजारपेक्षा जास्त नागरिकउपस्थित होते. त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख पन्नास हजार चौरस फुट एवढे होते. मैदानावर आखणी करण्यासाठी साठ टन चुन्याची फक्की वापरण्यात आली होती, संपूर्ण आखणीची लांबी एकूण ७० किलोमीटर एवढी झाली होती. पुण्यातील आणि परगावाहून आलेल्या स्वयंसेवकांसाठी ४३ सिद्धता (तयारी) केंद्रांची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर परत जाणाऱ्या परगावच्या स्वयंसेवकांना ८० हजार जेवणाची पाकिटे- शिदोरी सोबत देण्यात आली. त्यामुळे स्वयंसेवकांची सोय झाली.
एलईडी स्क्रीनमुळे वाढली रंगत
शिवशक्ती संगमाचे विराट स्वरूप पाहता प्रत्येकाला व्यासपीठ स्पष्टपणे दिसणे अवघड होते. त्यामुळे अडीच लाख चौरस फुटाच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी एलईडी स्क्रिन उभारण्यात आले होते, त्यामुळे सर्वांना अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रमामध्ये सहभागी होता आले. या कार्यक्रमासाठी डिजिटल तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. कार्यक्रमासाठीची नावनोंदणी आँनलाईन पद्धतीने करण्यात आली होती. स्वयंसेवकांच्या नोंदणीसाठी बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला. एलईडी स्क्रिनकडेही नागरिकांचे लक्ष वेधले जात होते. डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.
वारकऱ्यांचा लक्षणीय सहभाग
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे शक्तीचे तर वारकरी संप्रदाय हे भक्तीचे प्रतीक आहे. आम्हा सर्वांचे ध्येय एकच आहे, म्हणूनच आम्ही आज शिवशक्ती संगमात सहभागी झालेलो आहोत असे प्रतिपादन ह.भ.प. मोरे महाराज यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित शिवशक्ती संगमात आळंदी येथील विविध मठांमधील वारकऱ्यांच्या दिंडी व वारकरी लक्षणीय संख्येने सहभागी झाले. या वारकऱ्यांच्या दिंडीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले जात होते. या सोहळ्यात वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.