आजारपणामुळे विष्णू सवरा यांना मंत्रीमंडळातून वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:08 AM2019-06-17T05:08:37+5:302019-06-17T05:09:02+5:30
विष्णू सवरा हे आजारपणामुळे गेले ४ महिने ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात तसेच मंत्रीमंडळांच्या बैठकीतही ते उपस्थित राहत नव्हते
- वसंत भोईर
वाडा (पालघर) : महाराष्ट्रचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या वेळी मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे. ते पित्ताशयाच्या विकाराने आजारी आहेत. त्यांच्यावर पुढील महिन्यात मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्यांनीच आपणाला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
विष्णू सवरा हे आजारपणामुळे गेले ४ महिने ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात तसेच मंत्रीमंडळांच्या बैठकीतही ते उपस्थित राहत नव्हते, असे त्यांचे चिरंजीव आणि सर्जन डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले. यामुळे पालघर जिल्ह्याला मिळालेले एकमेव मंत्रीपद आता हरपले आहे. आदिवासी योजना आढावा समितीच्या राज्यमंत्री दर्जाच्या अध्यक्षपदाच्या रुपाने वसईच्या विवेक पंडीत यांच्या स्वरुपात राज्यमंत्री दर्जाचे पद पालघर जिल्ह्याला अलीकडेच मिळाले आहेत.
सवरा यांच्या रुपाने राज्याचे आदिवासी विकासमंत्रीपद पालघर जिल्ह्याला लाभले होते. ते आता हरपले आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे गेले काही महिने ते खूपच अशक्त झाले होते. त्याचप्रमाणे पक्षकार्य, खात्याच्या बैठका, सार्वजनिक कार्यक्रम यापासून ते अलिप्त राहत होते.
सवरा यांच्याबद्दल तसेच त्यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल पक्षात आणि एकूणच प्रचंड नाराजी होती. त्यामुळे ते राहत असलेल्या वाडा या शहराच्या नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कन्या निशा पराभूत झाली होती. तर ही नगरपंचायत शिवसेनेने जिंकली होती. ते पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, पालघर, या दोन नगरपंचायती व जव्हार पालिका यात सेनेचा झेंडा फडकला होता. २०१८ मध्ये झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला पुत्र हेमंत याला भाजपने उमेदवारी द्यावी हा त्यांचा हट्ट पक्षाने धुडकावला होता. ही पोटनिवडणूक आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुक यातही त्यांना फारसे
स्थान पक्षाने दिले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या पुत्राला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून भाजपा पुढे करतो की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातून भाजप कुणाला मंत्रिपद देते याकडे लक्ष
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि डहाणू या दोनच मतदारसंघात भाजपाचे आमदार होते. यापैकी विक्रमगड मधून सवरा निवडून आले होते तर डहाणूचे आमदार पास्कल धनारे हे पालघर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष असले तरी त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे आता भाजप या जिल्ह्यातून कुणाला मंत्रीपद देते याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.