राज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:15 AM2018-12-11T02:15:56+5:302018-12-11T02:16:19+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

Due to increase in the number of recruitment of state services, the students are given relief | राज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (६९ जागा) यंदा जागांची संख्या वाढल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी (४० जागा), पोलीस उपअधीक्षक (३४ जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (१६ जागा), उद्योग उपसंचालक (२ जागा), तहसीलदार (७७ जागा), उपशिक्षणाधिकारी (२५ पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (३ जागा), कक्ष अधिकारी (१६ जागा), सहायक गट विकास अधिकारी (११ जागा), उद्योग अधिकारी (५ जागा), नायब तहसलीदार (११३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या पूर्व परीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरायचे आहेत. पूर्वपरीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यातील ३७ केंद्रांवर घेतली जाणार आहे. या पूर्वपरीक्षेत पात्र ठरणाºया विद्यार्थ्यांची १३ ते १५ जुलै २०१९ मध्ये मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यसेवेची मागील वर्षी केवळ ६९ पदांसाठी जाहिरात निघालेली होती. राज्यभरात लाखो विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करीत असताना इतक्या कमी जागांची जाहिरात निघाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा भरतीच्या पदांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

उपशिक्षणाधिकाºयांची २५ पदे
राज्य आयोगाकडून यंदा उपशिक्षणाधिकारी पदाच्या २५ जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत उपशिक्षणाधिकारीपदाच्या जागा निघाल्या नव्हत्या, यंदा चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राज्यसेवेंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरतीप्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहायक संचालक, उद्योग संचालक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आदी पदांसाठी तांत्रिक अर्हता पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. 
राज्य आयोगाकडून एकूण १३०० गुणांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षा ४०० गुण, मुख्य परीक्षा ८०० गुण व मुलाखतीसाठी १०० गुण असणार आहेत.

जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता...
राज्यसेवेअंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरतीप्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील ३४२ रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जाहिरातील नमूद केलेल्या या जागांव्यतिरिक्त पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत जागांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव जागा पूर्वपरीक्षेच्या निकालात विचारात घेण्यात येतील, तसेच मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे त्या जाहीर करण्यात येतील, असे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र आवश्यक
मराठा आरक्षणाच्या (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) प्रवर्गातील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी (मुलाखतीच्या वेळेस) ७ डिसेंबर २०१८ अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी १५ जुलै २०१४ अन्वये जात प्रमाणपत्र काढले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Due to increase in the number of recruitment of state services, the students are given relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.