सूर्या कालव्याच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे भातरोपे करपली; पेठ परिसरातील भातलावणीही खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 01:09 AM2021-02-21T01:09:43+5:302021-02-21T01:09:53+5:30
परिणामी कालव्यांना टोकाला जोडणाऱ्या बऱ्याच गावांना अपुरा पाणीपुरवठा होतो.
शशिकांत ठाकूर
कासा : सूर्या कालव्यातून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कालव्यांना जोडणाऱ्या टोकाच्या बऱ्याच गावांतील शेती वाया जाण्याची भीती आहे. पाण्याअभावी भात रोपण्या खोळंबल्या असून पेठ येथील भातरोपे तर करपून गेली आहेत.
सूर्या कालव्यांतर्गत सुमारे १४ हजार पाचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आणली असून डहाणू तालुक्यातील तवा, धामटने, पेठ, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे कासा, चारोटी, सारणी, आंबिवली, उर्से, साये, आंबिस्ते, रणकोळ, रानशेत आदी, तर पालघर तालुक्यातील सोमटा, आंबेदा, नानिवली, रावते, बोरशेती, चिंचारे, आकेगव्हान, महागाव, कुकडे आदी सुमारे १०० गावांना उजव्या व डाव्या कालव्यांतर्गत शेतीसाठी उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो.
सिंचन या प्रमुख उद्देशाने या धरणाची निर्मिती केली असली तरी आता बिगरसिंचनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामधून जलसंपदा विभागास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो, मात्र तरीही गेल्या १५ वर्षांपासून कालव्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कालवे नादुरुस्त आहेत. बऱ्याच ठिकाणी मुख्य व उपकालव्याचे बांधकाम तुटले आहे, तर प्लास्टर वाहून गेल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर निचरा होते. तसेच मुख्य कालव्यातून उपकालव्यांना शेतीला पाणी सोडणारे गेट तुटून गेले आहेत.
त्यामुळे पाणी वाया जाते. परिणामी कालव्यांना टोकाला जोडणाऱ्या बऱ्याच गावांना अपुरा पाणीपुरवठा होतो. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात, मात्र तरीही याकडे जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत. तालुक्यातील पेठ येथे गेल्या पंधरा दिवसांत पाणीच पोहोचले नाही, त्यामुळे भात पेरलेल्या शेतांना भेगा पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची रोपे पूर्ण होरपळून गेली आहेत. महागडी बियाणी, खते वापरूनही उपयोग नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.