आमदारांच्या मध्यस्थीमुळे वीजप्रश्न निकाली
By Admin | Published: August 26, 2016 02:23 AM2016-08-26T02:23:00+5:302016-08-26T02:23:00+5:30
वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता
नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यात २४ ग्रामपंचायती असून वीज मंडळाने ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या पोलवरील एखादा बल्ब अथवा ट्यूब खराब अथवा बंद पडल्यास वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची व्यथा आ. पंडित पाटील यांच्या पुढे मांडण्यात आली होती. याची दखल घेऊन आमदारांनी हा प्रश्न सोडविला आहे.
ग्रामपंचायतीकडे कोणताही प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे पोलवर चढून दुरु स्तीचे काम करणे फार कठीण होते. याबाबत काही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत यांच्याशी संपर्कसाधून आपली व्यथा मांडली होती. मनोज भगत यांनी हा प्रश्न आमदार पंडित पाटील यांच्याकडे मांडला व ग्रामपंचायतींना दिलासा देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आमदार पाटील यांनी बुधवारी वीज मंडळाचे पेण येथील अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांची कार्यालयात भेट घेऊन ग्रामपंचायतीची बाजू मांडली यावेळी ते म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक बाजू सक्षम नसून प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करणे ही कठीण बाब आहे.उंच पोलवर चढणे हे ग्रामपंचायत कर्मचारी यांना जमणारच नाही.वीज मंडळाचे कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत त्यांचे काम त्यांनाच करून द्यावे. ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल परंतु पोलवरची कामे ही वीज कर्मचारी यांनीच केली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. यावर अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका उपकार्यकारी अभियंता यांना पोलवरील सर्व कामे हे आपलेच कर्मचारी करतील प्रत्येक कर्मचारी यांनी ग्रामपंचायत यांना सहकार्य करावे असे आदेश दिले.
या झालेल्या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुडचे वीज मंडळाचे उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधीक्षक अभियंता यांचे आदेश प्राप्त झाले असून आमचे वीज कर्मचारी ग्रामपंचायतीस सहकार्य करतील असे सांगितले आहे.(वार्ताहर)
>वीजपुरवठा होणार सुरळीत
आमदार पंडित पाटील म्हणाले की, मुरु ड शहराचा जो कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.कमी दाबाच्या वीज पुरवठ्यापासून मुरु डकरांची कायम मुक्तता होणार असून वीज मंडळाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे वीज पुरवठा आत्ता सुरळीत होणार आहे असे त्यांनी सांगितले.