बोगस जातप्रमाणपत्र दिल्याने मुंबईच्या विद्यार्थिनीवर गुन्हा, रॅकेटची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:33 AM2018-04-29T05:33:11+5:302018-04-29T05:33:11+5:30
बनावट जातप्रमाणपत्र देऊन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी
कोल्हापूर : बनावट जातप्रमाणपत्र देऊन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुशरा मोहम्मदरशिद शेख (रा. एम १, डी विंग, दुधवाला कॉम्प्लेक्स, बेलासीस रोड सेंट्रल पूर्व, मुंबई) या विद्यार्थिनीविरुद्ध शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बनावट जातप्रमाणपत्र देऊन वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊन देणारे रॅकेट मुंबईत कार्यरत असून बुशरा शेखला अटक केल्यानंतर याचा पर्दाफाश होईल, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी शनिवारी दिली.
बुशरा शेख हिने येथील वैद्यकीय महाविद्यालयात २००८ मध्ये प्रवेश घेतला होता. यावेळी तिने जातीचे प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर २१ जुलै २००८ ला प्रवेश घेतला. त्यानंतर ती शिक्षण पूर्ण करुन मुंबईला गेली. वैद्यकीय महाविद्यालयाने नाशिक, मुंबई येथे चौकशी केली असता शेख हिचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी अश्विनकुमार भाईदास चव्हाण यांनी शुक्रवारी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. बुशरा शेख ही सध्या मुंबईत एम. डी. चे शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी तिला प्रमाणपत्र आणून दिले होते. बनावट जातप्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या रॅकेटची व्याप्ती मोठी आहे. त्यांनी प्रमाणपत्रे कोठून बनविली, त्या छापखानावाल्याकडेही चौकशी केली जाणार आहे. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, त्यांचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.