‘शिवशाही’ न आल्याने बुडाले उत्पन्न
By admin | Published: June 20, 2016 04:01 AM2016-06-20T04:01:44+5:302016-06-20T04:01:44+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बस आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा लोकार्पण सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला पार पडला.
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बस आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा लोकार्पण सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला पार पडला. महामंडळाकडून एप्रिल ते जून या गर्दीच्या हंगामात शिवशाही बस ताफ्यात आणल्या जाणार होत्या. मात्र अद्यापही बस दाखल न झाल्याने गर्दीच्या दोन महिन्यांतील हंगामात जवळपास सात कोटींपेक्षा जास्त अपेक्षित उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे.
एसटी महामंडळाचे प्रवासी कमी होण्याबरोबरच उत्पन्नही कमी होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी मिळविण्यासाठी महामंडळाकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. यात खासगी बस कंपन्यांनी स्पर्धा निर्माण केल्याने एसटी महामंडळाने उत्तम दर्जाच्या बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या जवळपास ७0 एसी बस विकत घेतल्यानंतर महामंडळाकडून भाड्याच्या ५00 एसी बसही दाखल केल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश असलेल्या ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया मागील वर्षात सुरू करण्यात आली. या बसचे नामकरण करीत त्याचे नाव ‘शिवशाही बस’ असेही करण्यात आले आणि २0१६ च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने काही योजनांचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पाडतानाच शिवशाही बस सर्वांसमोर सादर करण्यात आली. या बस एसटी महामंडळाकडून १५ एप्रिल ते १५ जून या गर्दीच्या हंगामात चालविण्यात येणार होत्या. मात्र गर्दीचा हंगाम उलटूनही एकही बस ताफ्यात दाखल झालेली नाही. एका बसमागे २,५00 रुपये याप्रमाणे
५00 बसमागे दिवसाला १२ लाख ५0 हजार रुपये अपेक्षित उत्पन्न महामंडळाने गृहीत धरले होते.
परंतु बस गर्दीच्या हंगामात दाखल
न झाल्याने सात कोटींपेक्षा
जास्त उत्पन्नावर महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे. अजूनही शिवशाही बसची बांधणी सुरू असून त्या बस कधी ताफ्यात दाखल होतील, यावर ठोस असे उत्तर महामंडळाकडे नाही. (प्रतिनिधी)