‘गोल्डन अवर’मध्ये उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
By admin | Published: June 13, 2015 03:43 AM2015-06-13T03:43:10+5:302015-06-13T03:43:10+5:30
पाऊण तास मिळाली नाही रुग्णवाहिका,हिंदुजा रुग्णालयाच्या बेपर्वाईमुळे अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णाला जीव गमवावा लागला.
मुंबई : प्रकृती चिंताजनक असताना आणि आत्यंतिक शारीरिक वेदना होत असतानाही रुग्णवाहिका तत्काळ पाठवण्याऐवजी प्रक्रियेत वेळ घालवणाऱ्या हिंदुजा रुग्णालयाच्या बेपर्वाईमुळे अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णाला जीव गमवावा लागला. हिंदुजा रुग्णालय आणि फॅमिली डॉक्टरकडून ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्याने बन्सीधर बजाज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घडले ते असे :
रविवार, ७ जून
स्थळ : सेन्स्ड अपार्टमेंट, युनियन पार्क, आंबेडकर रोड, खार (प.). वेळ : संध्या. ६.३० वा.
बन्सीधर यांना छातीत दुखू लागले. त्या वेळी त्यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंदुजा रूग्णालयाला त्यांनी फोन केला. तत्काळ वैद्यकिय मदतीसाठी रूग्णवाहिका पाठवण्याचे सांगितले. मात्र तत्काळ मदत देण्याऐवजी रूग्णालयाकडून रूग्णाची मेडिकल हिस्ट्री विचारण्यात आली. रूग्णाचे नाव? वय यासह त्यांच्यावर चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरचे नाव काय? त्यांची बायपास कधी झाली होती? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. एवढे करुनही त्यांची रुग्णवाहिका पोहोचलीच नाही,
असे बन्सीधर यांचे लहान भाऊ सुंदरलाल बजाज यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बजाज कुटुंबियांनी फॅमिली डॉक्टर रमेश मेहता यांच्याशीही संपर्क साधला. मात्र गोरेगावला सिनेमागृहात असल्याने येऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही बजाज कुटुंबियांनी बन्सीधर यांच्या गंभीर प्रकृतीची कल्पना देत त्यांना तत्काळ मदतीसाठी येण्याची विनंती केली. मात्र मेहता यांनी येण्यास असमर्थता दर्शवल्याचा आरोप बजाज कुटुंबाने केला आहे.
हिंदुजा रूग्णालय आणि फॅमिली डॉक्टरकडून प्रतिसाद न मिळाल्याने एका नातेवाईकाने जीवनदायी रूग्णवाहिकेला (१०८ क्रमांक) फोन केला. त्यानंतर बजाज यांना रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र या सर्व प्रकारात सुमारे ४० ते ४५ मिनिटांचा वेळ खर्ची गेला.
पण जीवनदायी रुग्णवाहिकेबरोबर आलेल्या डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. १० मिनिटे अगोदर वर्दी मिळाली असती तरी त्यांना वाचवता आले असते, असे जीवनदायी रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)