पाणी, स्वच्छतेअभावी ऐतिहासिक विशाळगडाची रया गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 12:54 AM2017-05-23T00:54:55+5:302017-05-23T00:54:55+5:30
इतिहास संशोधक, पर्यटकांतून संताप : शिवकालीन पाणी स्रोतांच्या पुनरुज्जीवनाची गरज; प्रशासनाचे दुर्लक्ष
हंदवी स्वराज्यातील गौरवशाली विशाळगड! मराठ्यांच्या संस्थानातील एक महत्त्वाचे ठिकाण, हजारो घोड्यांची फौज या गडावर मोठ्या दिमाखात होती. हा गड आजही मोठा शिवकालीन पाणीस्रोत जपून आहे. मात्र, बेवारस अवस्थेतील हे स्रोत अक्षम्य दुर्लक्षामुळे आटून गेले आहेत. हे स्रोत पुनरुज्जीवित व संरक्षित केल्यास येथे पाण्याची गंगा अवतरेल व सध्या येथील नागरिकांची व पर्यटकांची पाण्याअभावी होणारी प्रचंड गैरसोय व आर्थिक लूट थांबविली जाईल. तसेच शिवकालीन ठेव्याची जपणूकही होईल.
राजेंद्र लाड । लोकमत न्यूज नेटवर्क---आंबा : किल्ले विशाळगड पाचशे लोकवस्तीचा गड, शिवकालीन जाज्वल्य इतिहास व हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याने येथे वर्षभरात दोन उरूस, शिवजयंती, महाशिवरात्र, बाजीप्रभू पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरे होतात. या काळात गडावर मोठी गर्दी लोटते. शिवाय सुटीदिवशी भाविकांची रीघ असतेच; पण येथे येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी व खर्चासाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने पाण्यातून पैसा मिळविणारी व्यावसायिकता येथे आजही आहे. पाण्याचा तुटवडा असल्याने सुलभ शौचालय सुविधेचा विचार येथील प्रशासनाला शिवलेला नाही. साहजिकच भाविकांना उघड्यावर शौचास बसावे लागते. याशिवाय अस्वच्छता, दुर्गंधी, प्लास्टिक-बाटल्यांचे ढिगारे, कोंबड्यांच्या पिसांचे कोंडावळे या गडाचे पावित्र्य संपवत आहेत. पुरेशा पाणी सुविधेसाठी गडावरील शिवकालीन पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित केले तर गडावर पाण्याची गंगा अवतरेल आणि पाण्याअभावी गडाची होणारी रया रोखता येईल. यासाठी पुरातत्त्व विभाग व महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाने गडावरील व पायथ्याखालील शिवकालीन स्रोत शोधून त्यांच्या पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी भाविक व पर्यटकांतून होत आहे.
सध्या गडावर अर्धचंद्रकोर विहीर, नगारबाव, राजवाडा हौद, भूपाळ तळे, भगवेतेश्वर मंदिर विहीर, अमृतेश्वराचे पाण्याचे टाके व बाजीप्रभू समाधीजवळ बारमाही झरा, पायथ्याखालचे तोफेचे पाणी हे शिवकालीन पाणीस्रोत आहेत. शिवाय केतकीचे वन, रणमंडळ टेकडीजवळचे वीसच्यावर झरे कपारीलगत बारमाही पाझरत आहेत. पावसाळ्यात तर चारी बाजूने प्रपात कोसळत असतात; पण अतिक्रमण व बेवारस अवस्थेत पडलेले येथील पाण्याचे स्रोत काही लुप्त झाले आहेत, तर बहुतेक घाणीच्या वेटोळ्यात आहेत. गडावरील विहिरी, हौद, टाके, झरे व भूपातळ्यातील गाळ काढून समान तत्त्वावर पाण्याचे वाटप झाले तर पाण्यात पैसा मिळवणारा गड म्हणून बनलेली विशाळगडची ओळख बदलता येईल, असे इतिहासतज्ज्ञ भगवान चिले यांनी स्पष्ट केले.
चार महिने अतिवृष्टी पेलणारा हा गड, पण जलसंधारण व वृक्षारोपण मोहिमेपासून दूर आहे. रणमंडळ टेकडी, मारुती टेकडी, पाताळ व लग्नाचे वऱ्हाड व माचाळकडे जाणारा मार्ग हा परिसर मोठे माळ व टेकड्या घेऊन आहे. येथे समपातळी चर खोदकाम केले तर जलसंधारण मोहिमेतून शिवकालीन स्रोत पाण्याने समृद्ध करता येतील, असे चिले यांनी सांगितले.
अर्धचंद्रकोर विहीर इतिहासाचा ठेवा..
रामचंद्रपंत अमात्य यांनी सतराव्या शतक्यात ही विहीर अष्टमीच्या चंद्रबिंबाप्रमाणे बांधली आहे. पाण्याभोवती काळेपाषाण दगड गोलाकार बांधले आहेत. सभोवतालच्या दगडी कट्ट्यात छोटी घुमटी आहे. त्यातून जिवंत पाण्याचे झरे पाझरतात. ही विहीर १७ फूट लांब, १० फूट खोल आहे. स्वराज्यात शिवबंदीला पाणी पुरविणारा मुख्य जलस्रोत होता. आज ती विहीर बेवारसपणे कोरडेपण जपत आहे.