‘लोकमत’मुळे उत्तम साहित्यिक समाजासमोर
By admin | Published: November 24, 2015 12:44 AM2015-11-24T00:44:10+5:302015-11-24T00:44:10+5:30
एखादे दर्जेदार वृत्तपत्र समाजासाठी काय-काय करू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘लोकमत’ आहे. साहित्यनिर्मिती करणाऱ्या उत्तमोत्तम साहित्यिकांना समाजासमोर
पुणे : एखादे दर्जेदार वृत्तपत्र समाजासाठी काय-काय करू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘लोकमत’ आहे. साहित्यनिर्मिती करणाऱ्या उत्तमोत्तम साहित्यिकांना समाजासमोर आणण्याचे अत्यंत विधायक काम ‘लोकमत’ने केले आहे, असे प्रशंसोद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काढले.
‘लोकमत’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित मोहर ग्रुप प्रस्तुत लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या आजवरच्या वाटचालीत ‘लोकमत’चा वाटा मोठा आहे. वृत्तपत्रांची स्पर्धा असणार; परंतु ती निरपेक्ष असायला हवी. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत चांगल्या लोकांच्या मागे राहून व वाईट प्रवृत्तींवर हल्ला करणारे ‘लोकमत’ सामान्य माणसाच्या जीवनाशी खऱ्या अर्थाने एकरूप झालेले आहे. सकाळी चहामध्ये साखर कमी असली अथवा दुपारी जेवणामध्ये वरणात डाळ कमी असली तरी एक वेळ चालते; परंतु घरी ‘लोकमत’ असणे आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. साहित्यिक हे स्वत:हून कुणाकडे जात नाहीत. त्यांची जीवनशैली ठरलेली असते. जीवनगौरव ज्यांना दिला ते डॉ. रा. चिं. ढेरे, अर्थात अण्णा यांना मी लहान असल्यापासून पाहिले आहे. असंख्य पुस्तकांच्या गराड्यामध्ये मांडी घालून बसलेले अण्णा मी पाहिलेत; त्यामुळे या सर्व निवडी सार्थ आहेत.
‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाचे वितरण करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. अभिजित जोशी व सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या नांदीने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली. विजय बाविस्कर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले व आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
साहित्यिकांना देण्यात आलेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे. पुरस्कारार्थींचे प्रथम अभिनंदन! ‘लोकमत’ परिवारतील मी एक सदस्य आहे. लोकमतमध्ये काम करीत असताना अनेक प्रकारचे साहित्य वाचनात आले. साहित्याचे जग अनुभवायला मिळाले. साहित्य, कला क्षेत्रातील पुरस्कार देताना नेहमीच मतमतांतरे होतात. पुरस्कारांविषयी पूर्वग्रहदूषित असतो. संगीत, नाट्य स्पर्धांचे निकाल वादग्रस्त ठरतात, काही सुखावणारे असतात. त्यापैकी लोकमतचे हे पुरस्कार आहेत. अभिव्यक्तीचा जेंव्हा प्रश्न निर्माण होतो, मर्यादेचा प्रश्न निर्माण होतो, त्या वेळी जास्त चिंता वाटते. वास्तवावादी लिखाण व्हावे असे ज्या वेळी वाटते, त्या वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात, त्या वेळी लेखकावर दडपण येते. साहित्यकृती निर्माण होत असताना साहित्यिकांवर सकारात्मक दडपण येवो, अशीच इच्छा व्यक्त करतो.
- अजय अंबेकर, संचालक,
राज्य सांस्कृतिक संचालनालय
पत्रकार, साहित्य आणि संस्कृतीचा अनुबंध जपण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून झाले आहे. साहित्यिकांचा गौरव करणाऱ्या ‘लोकमत’चे संचालक, नेतृत्वाचे अभिनंदन करतो. साहित्य संस्कृतीचा सन्मान करणे, कर्तव्याच्या भावनेतून देणे अभिनंदनीय भावना आहे. १० पुरस्कारांच्या मालिकेमध्ये निवडलेले साहित्यिक उत्तम आहेत. रा. चिं. ढेरे यांना पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य व्यक्तीचा गौरव आहे. प्रबोधनाचे कार्य करीत असताना सत्य आणि श्रद्धा यात संघर्ष निर्माण होत असतो. अशा वेळी साहित्यिकाची दमाछाक होते. मराठीतील, मराठी संस्कृतीतील तपस्वी असे हे व्यक्तिमत्त्व आहे. राजवाडे यांची परंपरा त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केली आहे. आजवरच्या संशोधनाच्या परंपरेचा गौरव ढेरे यांना दिलेल्या जीवनगौरव पुरस्काराने झाला आहे. सर्व पुरस्कार्थींचे मन:पूर्वक अभिनंदन!
- डॉ. श्रीपाल सबनीस, नियोजित अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,
पिंपरी-चिंचवड