महाद्वार काल्याने पंढरपुरातील आषाढी वारीची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 02:46 PM2019-07-18T14:46:58+5:302019-07-18T14:51:59+5:30
दहीहंडी फोडून भाविकांना वाटला प्रसाद; ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीकडे रवाना
पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. खºया अर्थाने या काल्याने आता आषाढी यात्रेची सांगता झाली. दरम्यान, मंगळवारी ग्रहणामुळे मुक्कामी असलेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज महाद्वार काल्यानंतर आळंदीकडे रवाना झाली.
पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून यामध्ये महाद्वार काल्याचाही समावेश आहे. येथील हरिदास घराण्यात जवळपास ४०० वर्षांपूर्वी संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेऊन काला करण्याची परंपरा आहे.
सभामंडप येथे काल्याचे मानकरी असणाºया ह. भ. प. मदन महाराज हरिदास यांनी खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यानंतर अनिल महाराज हरिदास यांनी काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडली व हंडीतील काला भाविकांना वाटला. मंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण केले. यानंतर कुंभार घाटमार्गे माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून हा सोहळा वाड्यात विसावला. येथे येणाºया हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. महाव्दार काल्यानंतर खºया अर्थाने आषाढी वारीची सांगता झाली. या काल्यासाठी शेकडो वारकरी पंढरीत थांबले होते.
पालखी सोहळा आळंदीकडे रवाना
ज्ञानेश्वर मंदिरातून आषाढी यात्रेचा सोहळा पार पाडून कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सजविलेला रथ बुधवारी दुपारी चार वाजता श्री क्षेत्र आळंदीकडे रवाना झाला. गोपाळपूरचा गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांचे पालखी सोहळे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. गेल्यावर्षी आणि यंदा असे सलग दोन वर्षे पौर्णिमेला गोपाळकाल्यादिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे यंदाही माउलींच्या पालखीचा पंढरपुरातील मुक्काम वाढला होता. बुधवारी दुपारी ४ वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. सोबत २ हजार वारकºयांसह वीणेकरी, पखवाज, तुळशीवाले, हंडेवाले व दिंड्या सहभागी झाल्या होत्या़ पहिला मुक्काम वाखरी येथे होणार आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविक रांग करून शिस्तीने दर्शन घेत होते़