मध्य रेल्वेमार्गावर मेल-एक्स्प्रेस गाड्यांमुळे मनस्ताप
By admin | Published: December 26, 2015 01:53 AM2015-12-26T01:53:27+5:302015-12-26T01:53:27+5:30
मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा प्रयत्न केला जात असतानाच लोकल गाड्यांना होणाऱ्या गर्दीचे आणखी एक कारण पुढे आले आहे.
मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस धावत असून, त्यामुळे दररोज २५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. लेटमार्क लागत असल्याने या लोकल गाड्यांना बरीच गर्दी होत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डोंबिवलीकर भावेश नकाते याचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अशा घटना होऊ नयेत यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एक समितीही नेमण्यात आली. या समितीकडून गर्दीतला प्रवास सुकर करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत. सध्या या समितीकडून काही सूचना करण्यात आल्या असून, त्यावर रेल्वेकडून अंमलबजावणीही केली जात आहे. तत्पूर्वी लोकलमध्ये गर्दी वाढण्यामागची कारणे रेल्वेकडून शोधली जात असून, यात मध्य रेल्वेमार्गावर मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल गाड्यांना चांगलाच लेटमार्क लागत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या जवळपास २२0 मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या आहेत. या मेल-एक्स्प्रेसमुळे दररोज २५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
गर्दीच्या वेळेस फटका
लेटमार्क लागणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. हा लेटमार्क ५ मिनिटे ते १५ मिनिटांपर्यंतचा आहे.
लेटमार्क लागल्याने लोकल गाड्यांना बरीच गर्दी होते. सीएसटी ते कल्याणदरम्यान जलद लोकल गाड्यांना आणि कल्याणपासून पुढे डाऊनला धीम्या व जलद लोकल गाड्यांना लेटमार्क होत असल्याचे सांगण्यात आले.
1618लोकल
फेऱ्या मध्य रेल्वेमार्गावर होतात. यातील दोन टक्के लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. जलद मार्गावरील बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, कल्याण जलद लोकल गाड्यांना सकाळी व संध्याकाळी गर्दीला सामोरे जावे लागत आहे.