म्हणे..घुशी, उंदीर व खेकड्यांनीच फोडला कालवा : पाटबंधारे विभागाच्या अजब तर्काला महाजनांचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 04:39 PM2018-09-28T16:39:37+5:302018-09-28T17:12:21+5:30
मुठा कालवा दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
पुणे: खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने या जलप्रलयात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कुणाचे पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुध्दा या कालव्याच्या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणातच होत्याचे नव्हते घडले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. परंतु, दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या दुर्घटनेची संबंधी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले.
महाजन यांनी शुक्रवारी (दि. २८ सप्टें) रोजी दुपारी दांडेकर पूल येथील दुर्घटना ग्रस्तांची भेट घेतली. भेटीदरम्यान आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थितल होते.
त्यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले, हा कालवा फुटण्यापाठीमागे घुशी, उंदीरखेकडाच जबाबदार आहे असे मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केले आहे. ते बरोबर असू शकते.परंतु, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही दुर्घटना अतिशय वेदनादायी आहे. पीडित कुटुंबांना सरकार व महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना पंचनामे करुन लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील महाजन यांनी यावेळी दिले. पीडितग्रस्त कुटुंबांचे महाजन यांनी समस्या जाणून घेताना त्यांचे सांत्वन देखील केले. ज्यांची घरे कोसळली. त्यांचे ज्यांची घरे वाहून गेली किंवा कोसळली त्यांचे पंचनामे करुन त्यांना घरांची पुनर्बांंधणी करुन दिली जाईल. भेटी दरम्यान महापौर मुक्ता टिळक उपस्थित असल्याने पीडित नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जलसंपदामंत्री महाजन यांच्यासमोर टिळकांविषयी संताप व्यक्त करताना नागरिक म्हणाले, घटनास्थळी भेट देताना महापौरांनी गांभीर्य न बाळगता या उद्भवलेल्या विदारक परिस्थितीवर हसल्या असे सांगत टिळकांच्या चुकांचा अक्षरश: पाढाच वाचला.