अरुंद पुलामुळे प्रवाशांची घुसमट, अपु-या सोईसुविधांमुळे रुग्णांसह धारावीकरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 06:32 AM2017-10-22T06:32:45+5:302017-10-22T06:34:20+5:30
मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
अक्षय चोरगे
मुंबई : मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. धारावीकरही या स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यातच सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात रेल्वेने येणारे रुग्णदेखील सायन रेल्वे स्थानकात उतरतात. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडते. अरुंद पुलावरून या रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना नातवाइकांची दमछाक होते. अपुरे तिकीटघर, प्रसाधनगृहांची दुरवस्था अशा अनेक असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
सायन रेल्वे स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत, त्यापैकी उत्तरेकडील पुलाचा फारच कमी वापर होतो. परिणामी, दक्षिणेकडील पुलावर नेहमी कोंडी होते. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या पुलावर धक्काबुक्की होते. महिला आणि ज्येष्ठांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत महिला प्रवाशांनी व्यक्त केली. धारावीकरांनाही सायन हे जवळचे स्थानक आहे. वाढती गर्दी व अरुंद पूल लक्षात घेता, येथे स्कायवॉकची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच रुग्णांसाठी लिफ्ट, सरकत्या जिन्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गेल्या आठवड्यात रेल्वेच्या विभागीय रेल्वे अधिकाºयांनी स्थानकाची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. लवकरच सायन रेल्वे स्थानकात पुनर्विकासाचे काम सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. लोकमान्य टिळक रुग्णालयात ये-जा करणाºयांसाठी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासादरम्यान लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
प्रसाधनगृहांची दुरवस्था
रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृह लहान व अतिशय अस्वच्छ असल्याने, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांच्या सोयीसाठी चांगले प्रसाधानगृह बनवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सायन स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पुलावर गर्दुल्ले ठाण मांडून बसतात. रेल्वे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, महिला प्रवासी या पुलाचा वापर करणे टाळतात, असे महिला प्रवाशांनी सांगितले.
>सूचना, तक्रारी, व्हिडीओ
‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास
८८४७७४१३०१
या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.
>कारवाईत सातत्य हवे
रेल्वे स्थानकावर येणाºया सर्वच मार्गांवर आणि पादचारी पुलांवर फेरीवाले बसतात. गेले काही दिवस कारवाई करण्यात येत असल्याने, फेरीवाल्यांची संख्या कमी झाली होती, परंतु या कारवाईत सातत्य हवे. कारण फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी होती. त्यामुळे फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त होणे आवश्यक असल्याचे प्रवासी गीता संसारे यांनी सांगितले.
>तिकीट घर हवे : रेल्वे स्थानकावर दोन तिकीट घरे आहेत, परंतु तिकीट खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा लागतात. वेळ कोणतीही असो, तिकीट घरासमोरील रांगा काही केल्या कमी होत नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएम आहेत, परंतु त्यापैकी अर्ध्या मशिन नेहमी बंद असतात. त्यामुळे अजून एक तिकीट घर असावे, तसेच बंद पडलेल्या एटीव्हीएम दुरुस्त करावे, अशी मागणीही प्रवासी करत आहेत.
>पुलाची मागणी
सायन रेल्वे स्थानकाची पाहणी करून, रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृहाची डागडुजी करावी आणि प्रसाधनगृह नेहमी स्वच्छ ठेवावे, याबाबत रेल्वेला सूचना दिल्या. रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांच्या रुंदीकरणासह धारावी येथील संत रोहिदास मार्गापासून ते सायन रेल्वे स्थानकापर्यंत पूल बांधावा, अशी मागणीही केली आहे. महापालिका या पुलासाठी अनुकूल आहे.
- राहुल शेवाळे, खासदार
>नवे रेल्वे स्थानक हवे
सायन ते माटुंगा हे खूप मोठे अंतर आहे. या दरम्यान एक नवे रेल्वे स्थानक बनवावे, अशी मागणी रेल्वेकडे केली आहे, ज्यामुळे धारावीमधील नागरिक नव्या स्थानकाचा वापर करतील. असे केल्यास सायन रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. स्थानिक आमदार तमिळ सेल्व्हन यांच्यासह रेल्वे स्थानकाची पाहणी करून पादचारी पुलाचे रुंदीकरण करावे, पूर्वेकडील स्कायवॉक रेल्वे स्थानकाला जोडावा, अशा मागण्या रेल्वे अधिकाºयांकडे केल्या आहेत.
- राजेश्री शिरवाडकर, नगरसेविका
>दुभाजकाची गरज
स्थानकावरील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा. दक्षिणेकडील पादचारी पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सकाळी आणि सायंकाळी या पुलावर कोंडी होते. गर्दीचे व्यवस्थापन व्हावे, याकरिता पुलावर दुभाजकाची गरज आहे.
- प्रदीप पोटे, प्रवासी
>पुलाचा विस्तार करावा
रेल्वे स्थानकावरील उत्तरेकडील पादचारी पूल लाल बहादूर शास्त्री मार्गापर्यंत वाढविला, तर त्या पुलाचा वापर होईल, तसेच या पुलावरील गर्दुल्ल्यांवर कारवाई व्हावी. स्थानकामधून बाहेर जाण्यासाठी नवा पादचारी पूल उभारावा.
- प्रदीप पांडे, प्रवासी