निसर्गानं दिलेल्या धोक्याच्या सूचनेमुळे शाश्वत विकासासाठी नद्या वाचवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:13 AM2017-09-18T06:13:45+5:302017-09-18T06:14:06+5:30
बेसुमार वृक्षतोड आणि नद्यांबाबत असणा-या बेफिकीर वृत्तीमुळे आपण आपल्याच भावी पिढ्यांना संकटात टाकत आहोत. निसर्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे. वेळीच हा इशारा ओळखून सर्वांनी एकत्रितपणे नद्यांचे रक्षण तसेच वृक्षलागवड व संगोपनाचे कार्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याची भावना राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर आदींनी रविवारी व्यक्त केली.
मुंबई : बेसुमार वृक्षतोड आणि नद्यांबाबत असणा-या बेफिकीर वृत्तीमुळे आपण आपल्याच भावी पिढ्यांना संकटात टाकत आहोत. निसर्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे. वेळीच हा इशारा ओळखून सर्वांनी एकत्रितपणे नद्यांचे रक्षण तसेच वृक्षलागवड व संगोपनाचे कार्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याची भावना राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर आदींनी रविवारी व्यक्त केली.
ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली ‘रॅली फॉर रिव्हर’ आणि महाराष्ट्राच्या वृक्षलागवड मोहिमेचा कार्यक्रम राजभवन येथील जलविहार सभागृहात पार पडला. या वेळी जग्गी वासुदेव, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री राजे अंबरीशराव अत्राम, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यासह राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नद्या या आपल्या जीवनवाहिन्या आहेत. मुंबईसारख्या महानगरात आजमितीला पाच नद्या वाहतात, नागपुरातून नाग नदी वाहते, नाशकात गोदावरी आहे तर पुण्यात मुळा-मुठा. दुर्दैवाने या सर्व नद्या आज अक्षरश: नाले बनले आहेत. वेळीच आपण या नद्या वाचविल्या नाहीत तर त्यांच्या काठावरील शहरे आणि गावांचे अस्तित्वच संपून जाईल. स्वच्छ भारत अभियानात नद्यांची स्वच्छता आणि संवर्धन हा महत्त्वाचा भाग असेल. शाश्वत विकासासाठी नद्यांचे रक्षण आणि वृक्षलागवड काळाची गरज बनल्याचे राज्यपाल म्हणाले.
तर जग्गी वासुदेव यांनी देशभर ‘रॅली फॉर रिव्हर’ ही मोहीम हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वसुंधरेच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या उपक्रमात महाराष्ट्र पूर्ण ताकदीने सहभागी होईल. निसर्गरक्षणाचे काम कसोटी क्रिकेटसारखे करून चालणार नाही, तर एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासारखा विचार व कृती करावी लागेल. वृक्षलागवड मोहिमेच्या माध्यमातून गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि तापी आदी नद्यांच्या तीरावरील हिरवळ वाढवून नद्या वाचविण्याचा आमचा उद्देश आहे. येत्या तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी सचिन तेंडुलकरनेही भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी येताना मी वृक्षारोपण करूनच आलो आहे. जेव्हा एखादा रेकॉर्ड तुटतो, तेव्हा आनंद होतो. संघाच्या विजयात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो. सध्या निसर्गही रेकॉर्ड तोडतोय, त्याकडे लक्ष द्यायला हवे. निसर्गसंवर्धनाचे काम आपल्याला सर्वांना एकत्र येऊन करावे लागेल, असे सचिन म्हणाला.