नऊ महिन्यांच्या गर्भवतीला डांबले पोलीस ठाण्यात, गुडमॉर्निंग पथकाची अजब कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 03:55 PM2017-10-06T15:55:40+5:302017-10-06T18:31:35+5:30
हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार मेडशी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.
अनिस बागवान
मेडशी (वाशिम): हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार मेडशी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. माणुसकी हरविलेल्या गुडमॉर्निंग पथकातील कर्मचा-यांनी रस्त्यावर फेरफटका मारत असलेल्या एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीला कुठलीच हयगय न करता वाहनात टाकून पोलीस चौकीत जमा केले. यादरम्यान तिला असह्य त्रास सुरू झाल्याने तिची तडकाफडकी अकोला येथे उपचारासाठी रवानगी करावी लागली.
जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी उघड्यावर जाणा-यांना पोलीस चौकीत आणून त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही बाब स्वच्छता राखण्यात बहुतांशी फलदायी ठरत असली तरी यादरम्यान गुडमॉर्निंग पथकाने परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र, पथकातील निर्ढावलेल्या काही कर्मचा-यांकडून माणुसकी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. मेडशी येथे सकाळी एक नऊ महिन्याची गर्भवती महिला नित्यनेमानं गावकुसातील रस्त्यावर फेरफटका मारण्यानिमित्त घराबाहेर पडली.
रस्त्यावर शतपावली करीत असताना नेमक्या त्याचवेळी गुडमॉर्निंग पथकाचे वाहन त्याठिकाणी धडकले. कुठलीही वास्तपूस्त अथवा शहानिशा न करता पथकातील कर्मचा-यांनी सदर महिलेला वाहनात टाकून पोलीस चौकीत आणले. यादरम्यान आदळआपट झाल्याने गर्भवती महिलेस त्रास सुरू झाला. त्यामुळे तिच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अकोला येथे पुढील उपचाराकरिता रवानगी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी दिल्यामुळे गावच्या ग्रामसेवकासह गुडमॉर्निंग पथकातील कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.