वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मातेसह बालकाचा मृत्यू,आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर;मेळघाटातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 06:15 PM2017-08-24T18:15:39+5:302017-08-24T18:15:56+5:30
मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला.
पंकज लायदे
अमरावती, दि. 24 - मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मेळघाटातील माता व बालमृत्यूचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आरोेग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राणीगाव ग्रामपंचायतीअंतर्गत एक मोबाईल आरोग्य पथक असून त्यांना पाच गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये राणीगाव, सिनबंद, कंजोली, मोथाखेडा व गोलाई या गावांचा समावेश आहे. या आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारीच नाही. फिरत्या पथकातील आरोग्य अधिका-यांना प्रतिनियुक्तीवर बैरागड येथे पाठविल्याने ही ५ गावे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. परिणामी कंजोली येथे माता व बालमृत्यूची घटना घडली.
याठिकाणी गर्भवती महिलांची वेळेवर तपासणी केली जात नाही, त्यांना वेळेवर औषधोपचारही मिळत नाही. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने प्रसूतीचा प्रश्नच येत नाही. यामुळेच सविता सावलकर हिचा मृत्यू झाला. सविताला २३ आॅगस्टच्या मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्यात. डॉक्टर आणि संदर्भसेवादेखील प्राप्त न झाल्याने घरीच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे एका मातेसह व नवजाताचा जीव गेल्याने गावकरी संताप व्यक्त करीत आहेत. एकीकडे आरोग्यमंत्री मेलघाटात येऊन उत्तम आरोग्यसेवा देण्याचा दावा करतात, तर दुसरीकडे मेळघाटात आरोग्यसेवा न मिळाल्याने माता व बालमृत्यू होताहेत. यासाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत निवासी डॉक्टर नसल्याचा ठराव घेण्यात आला होता. त्या ठरावासह निवेदनसुद्धा आरोग्य विभागाला देण्यात आले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने बाल व मातामृत्यूची ही घटना घडली.
- लक्ष्मण भिलावेकर,
सदस्य, ग्रामपंचायत, राणीगाव