खड्ड्यामुळे नाही, तर दुचाकीच्या धडकेमुळे वझे आले ट्रकखाली, सीसीटीव्हीमधून धक्कादायक बाब उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:54 AM2017-12-10T04:54:59+5:302017-12-10T04:55:35+5:30
खड्ड्यामुळे नाही, तर पाठीमागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे बुद्धिबळाचे प्रसारक डॉ. प्रकाश वझे यांचा ट्रकखाली येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली.
- मनीषा म्हात्रे/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खड्ड्यामुळे नाही, तर पाठीमागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे बुद्धिबळाचे प्रसारक डॉ. प्रकाश वझे यांचा ट्रकखाली येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या अपघातादरम्यानचा एक सेकंदाचा थरारक घटनाक्रम कैद झाला आहे. विशेष बाब म्हणजे, ट्रक चालकाच्या जबाबाकडे दुर्लक्ष करत येथील सीसीटीव्ही पाहण्याची तसदीही पोलिसांनी घेतलेली नाही.
डॉ. प्रकाश वझे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार आणि रविवारी डॉ. वझे यांनी ‘निर्मला नारायण वझे स्मृती बुद्धिबळ स्पर्धे’चे आयोजन केले होते. याच स्पर्धेचे बॅनर आणण्यासाठी मदतनीस हनुमंत नागप्पा हेगडे यांच्यासोबत वझे शुक्रवारी दुपारी ठाण्यात गेले होते. ठाण्यातून बॅनर घेऊन ते पूर्व द्रुतगती मार्गे घरी निघाले. वझे नेहमीप्रमाणे २०च्या स्पीडला सावधपणे स्कूटी चालवत होते. दुपारी १२ वाजून ५७ मिनिटे ३५ सेकंदादरम्यान ते ठाण्याचा आनंदनगर टोल नाका पार करून मुलुंडमध्ये दाखल झाले. त्याच दरम्यान एका भरधाव दुचाकीस्वाराने त्यांच्या स्कूटीला पाठून धडक दिली. धडक देऊन चालक सुसाट पुढे जाऊन थांबला. दरम्यान, अवघ्या एका सेकंदाच्या अंतरातच पाठीमागून आलेल्या ट्रकखाली वझे चिरडले गेल्याचा धक्कादायक घटनाक्रम घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे चित्रीकरण ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहिले आहे. आपल्या धडकेमुळे स्कूटीवरील व्यक्ती ट्रकखाली आल्याचे समजताच दुचाकीस्वाराने घटनास्थळाचा अंदाज घेत पळ काढल्याचे यात दिसून येत आहे. याच फूटेजवरून वझे यांच्या मृत्यूपूर्वीच्या दोन सेकंदांच्या घटनाक्रमात खड्ड्यांमुळे नाही, तर दुचाकीच्या धडकेमुळे ते ट्रकखाली चिरडल्याचे उघड होत आहे. धडक देणाºया दुचाकीस्वाराच्या पाठीवरील बॅगवरून तो कुरियर बॉय अथवा सेल्समन असल्याचा अंदाज आहे. त्याने सफेद रंगाचे शर्ट परिधान केले असून, त्याच्या पाठीवर मोठी बॅग आहे. मात्र, त्याचा दुचाकी क्रमांक आणि चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट आलेला नाही. विशेष म्हणजे, एवढी मोठी दुर्घटना घडूनदेखील पोलिसांनी येथील फूटेज तपासणेही गरजेचे समजलेले नाही.
दुसरीकडे, ‘अहो साहेब मी धडक दिली नाही.. तेच माझ्या गाडीखाली आले...’ असे या गुन्ह्यात अटक केलेला ट्रकचालक नीळकंठ चव्हाण (४५) पोलिसांना ओरडून-ओरडून सांगत आहे. मात्र, त्याला पकडून हात वर केलेले पोलीस त्याच्या जबाबाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. चव्हाण हा घाटकोपर येथील रहिवासी आहे. चव्हाण यांना नागरिकांनी चोप देत, पोलिसांच्या हवाली केले आहे.
पोलिसांच्या वेळेत दोन तासांचा फरक
नवघर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये २ वाजून ४० मिनिटांनी त्यांचा अपघात झाल्याची नोंद केली आहे. मात्र, अपघात हा १२ वाजून ५७ मिनिटे ३५ सेकंदादरम्यान घडल्याचे सीसीटीव्हीवरून स्पष्ट होत आहे.
अशात पोलिसांच्या वेळेतही पावणे दोन तासांचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे गुन्ह्याचा तपास नेमका कसा सुरू आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.
घटनास्थळावर सीसीटीव्ही नसल्याचा पोलिसांचा दावा
अटक ट्रकचालकाची जामिनावर सुटका झाली असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्हींचा शोध घेतला आहे. मात्र, घटनास्थळी आनंदनगर टोलनाक्याचे सीसीटीव्ही नसल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी नेमक्या कोणत्या टोलनाक्याची तपासणी केली, यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
घटनाक्रम
१२ वाजून ५७ मिनिटे ३५ सेकंद - आनंदनगर टोल नाक्यावर दुचाकीची धडक
१२ वाजून ५७ मिनिटे ३६ सेकंद - वझे यांचा ट्रकखाली येऊन मृत्यू
एकामागोमाग असलेल्या गाड्यांच्या गर्दीत वझे त्याच्या चाकाखाली कधी आले, याचे भानही त्याला नव्हते. नागरिकांच्या ओरडण्याने ही बाब समजताच त्याने घाबरून गाडी पुढे जाऊन थांबविली. मात्र, त्याच्या या वेगादरम्यान हेगडेंच्या हातावरून ट्रकचे चाक गेले आणि यात हेगडेंनी एक हात गमावला.