मेट्रोमध्ये दंड बसू नये म्हणून त्यानं चक्क 30 फुटांवरुन मारली उडी
By admin | Published: June 27, 2017 11:02 AM2017-06-27T11:02:07+5:302017-06-27T11:14:00+5:30
मेट्रो स्टेशनवर केवळ दंड भरावा लागू नये म्हणून 18 वर्षांच्या तरुणानं 30 फूट उंचावरुन खाली उडी मारली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - मुंबई मेट्रोतील एक अजब व तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मेट्रो स्टेशनवर केवळ दंड भरावा लागू नये म्हणून 18 वर्षांच्या तरुणानं 30 फूट उंचीवरुन खाली उडी मारली आहे. इतक्या उंचीवरुन उडी मारुनही सुदैवानं हा तरुण बचावलादेखील आहे. रविवारी (26 जून) रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली आहे.
राजकुमार असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा ओडिशामधील रहिवासी आहे. ज्यावेळी सुरक्षा रक्षकांनी राजकुमार पकडलं तेव्हा तो नशेत असल्याचंही समोर आले. त्यावेळी चौकशीदरम्यान राजकुमारनं सांगितले की, तो साकी नाका मेट्रो स्टेशनहून घाटकोपर येथे आला. घाटकोपर येथे पोहोचल्यानंतर त्यानं टोकणचा वापर केला मात्र ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) गेट उघडलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारनं बाहेर येण्यासाठी AFC गेट वरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं सुरक्षारक्षकांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. नंतर तो तिकीट काऊंटर परिसरात आला, मात्र यावेळी मेट्रो कर्मचा-यांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. यावेळी सुरक्षा कर्मचारी राजकुमारला कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये घेऊन जात असताना त्यानं पळ काढला व 30 फुटांवरुन खाली उडी मारली.
यानंतर घाटकोपर पोलिसांच्या मदतीनं त्याला रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, तिकीट काढल्यानंतरही गेट का उघडलं नाही अशी विचारणा मेट्रो अधिका-याला केल्यानंतर त्यांनी सांगितले की, राजकुमारनं घाटकोपरपर्यंत तिकीट काढलं होतं. मात्र येथे आल्यानंतर तो स्टेशनवर फिरत होता. तिकीट काढल्यानंतर एक तासानंतर टोकण अमान्य होते.
राजकुमार जानेवारी महिन्यात मुंबईत आला होता आणि सध्या ते बोरिवली येथे वास्तव्यास आहे. राजकुमार सुरुवातील सांगितले की, घाटकोपरमध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी आला होता मात्र त्यानंतर तो म्हणाला की जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो होतो.