संसदीय कामकाजामुळेच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो
By admin | Published: November 20, 2014 02:31 AM2014-11-20T02:31:41+5:302014-11-20T02:31:41+5:30
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधिमंडळात पूर्णवेळ उपस्थित राहीलो. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक संसदीय आयुधाचा वापर केला
मुंबई : आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधिमंडळात पूर्णवेळ उपस्थित राहीलो. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक संसदीय आयुधाचा वापर केला. संसदीय कामकाजातील या सहभागामुळेच आज आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. विधीमंडळ सचिवालय आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने नवनिर्वाचित आमदारांसाठी आयोजित दोन दिवसीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
१३ व्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांची संख्या १३० आहे. त्यांच्यासह सर्वच आमदारांना विधीमंडळ कामकाजाची माहिती देण्याच्या उद्देशाने अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एक आमदार म्हणून अनेक प्रशिक्षण वर्गांना उपस्थित राहिल्याने अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, असे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता आणि आ. गिरीष बापट यांनीही सदस्यांना मार्गदर्शन केले. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी प्रास्ताविक केले. या अभ्यासवर्गात उद्या गुरुवारी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. निलम गो-हे, विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे यांचे मार्गदर्शन होणार आहे.