खड्ड्यांमुळे बसस्थानक झाले जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:26 AM2019-08-08T00:26:28+5:302019-08-08T00:26:56+5:30
मागील दोन वर्षांपासून बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अजूनपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दोन वर्षांपासून बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अजूनपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
दोन वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. सदर काम अजूनपर्यंत सुरूच आहे. बांधकामासाठी अर्ध्या बसस्थानकावर टीनपत्रे ठोकून जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे अर्धीच जागा वापरासाठी आहे. त्यामुळे समोरच्या जागेत बसेस उभ्या केल्या जात आहेत. मागील वर्षी बसस्थानक परिसरात मुरूम टाकण्यात आले होते. वर्षभराच्या वर्दळीत या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. यावर्षी मात्र मुरूम टाकण्यात आले नाही. त्यामुळे पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत.
या खड्ड्यांमध्येच बसेस उभ्या केल्या जातात. खड्ड्यांमधील पाणी तुडवत प्रवाशांना बसचे दार गाठावे लागते. चिखलामुळे भरलेल्या पायांमुळे बस सुद्धा चिखलमय होत आहेत. संबंधित कंत्राटदार अतिशय संथगतीने काम करीत असल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर केवळ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. इतर सौंदर्यीकरणाचे काम शिल्लक आहे. त्यासाठी पुन्हा दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रवाशांची अशीच दुरवस्था होणार आहे. चिखलामुळे प्रवासीच नव्हे तर चालक, वाहक सुद्धा कमालीचे त्रस्त झाले आहेत.
दोन वर्ष उलटूनही केवळ अर्धेच बांधकाम
कामाला सुरूवात होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र केवळ अर्धेच बांधकाम झाले आहे. कामाची गती अशीच सुरू राहिल्यास उर्वरित काम करण्यास पुन्हा दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.