खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 02:04 AM2016-07-21T02:04:46+5:302016-07-21T02:04:46+5:30

वाकड-काळाखडक रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यामुळे, पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे.

Due to the potholes, traffic congestion | खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

Next


वाकड : वाकड-काळाखडक रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यामुळे, पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांश वाहनधारक खड्डे चुकवून वाहन काढत असल्यामुळे, या रस्त्यावर वाहतूककोंडी देखील होत आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत असल्यामुळे, या ठिकाणी अपघाताचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे.
थेरगावहून वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कलाटेनगरजवळील वाकड ते काळाखडक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाकड रस्त्यावरून काळाखडककडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर हे खड्डे अधिकच मोठे झाले असून, खड्ड्यातील दगड-गोटे रस्त्यावर येऊन इतरत्र पसरले आहेत. या बारीक दगड-गोट्यांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रात्रीच्या सुमारास तर खड्ड्यांचा अंदाज लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक संथ गतीने वाहन चालवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून, या वाहतूककोंडीमुळे रहिवाशांना रस्ता ओलांडणेदेखील अवघड झाले आहे. यामुळे किरकोळ अपघाताचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या खड्ड्यांमध्ये पाणी व काडी-कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील नुकसान होत आहे. (वार्ताहर)
>दर वर्षी महापालिका प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात या रस्त्याची डांबर टाकून दुरूस्ती केली जाते. मात्र, यंदा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसून, खड्ड्यांची साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन, रस्त्यांत खड्डे की खड्डयांत रस्ते, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण आहे. प्रशासनाने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वर्दळ असलेल्या या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशी व वाहनधारकांतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Due to the potholes, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.